२००९ सालचा ३ इडियट्स या चित्रपटातून मराठमोळ्या ओमी वैद्यने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. लवकरच ओमी वैद्य अभिनित आणि दिग्दर्शित आईच्या गावात मराठीत बोल हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. १९ जानेवारी रोजी त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ओमीने स्वतः नायकाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने यात नायिकेची भूमिका साकारली आहे. पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, ईला भाटे, उदय टिकेकर, किशोरी शहाणे, ध्रुव दातार अशी भली मोठी स्टारकास्ट चित्रपटात आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने ओमीने प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यातील अशाच एका मुलाखतीत त्याने ३ इडियट्स चित्रपटाचा एक किस्सा सांगितला. ३ इडियट्समध्ये ओमीने चतुरची भूमिका गाजवली होती. चित्रपटाच्या माध्यमातून ओमी पहिल्यांदा बॉलिवूड सृष्टीत झळकला होता. अगोदर फारशी ओळख नव्हती त्यामुळे चित्रपटाच्या प्रीमियरला रेड कार्पेटवर त्याचे कोणीच फोटो काढले नव्हते. याबद्दल तो म्हणतो की, प्रीमियरच्या दिवशी रेड कार्पेटवर सगळ्यांचे फोटो काढले जात होते, पण माझ्यासोबत कोणीच फोटो नाही काढले. त्यांना माहितीच नव्हतं की मी कोण आहे ते. चित्रपट पाहायला आत गेलो, माझं त्यात भाषण होतं त्यानंतर इंटव्हल लागला.
अजून बराच चित्रपट बाकी असल्याने फ्रेश होण्यासाठी मी टॉयलेटमध्ये गेलो. पण तिथून परत आत जाण्यासाठी निघालो तेव्हा सगळेजण माझ्याकडे बघत होते. माझ्यापुढे सगळ्यांची गर्दी जमली होती. सगळेजण मला माझ्या कामाचं कौतुक करू लागले. टॉयलेटमधून चित्रपट बघायला सीटपर्यंत जाण्यासाठी मला अर्धा तास लागला, एवढी गर्दी माझ्यासमोर जमली होती. त्यानंतर आमिर खाननेही येऊन माझं कौतुक केलं. माझे मित्र तुझ्याचकडे बघत आहेत, आमच्यापेक्षा तूच जास्त फेमस झाला. माझ्या मित्रांमध्ये तर तुझंच नाव घेतलं जातंय अशी एक पावती त्यांनी मला दिली. ३ इडियट्स नंतर ओमी वैद्यने दिल तो बच्चा है जी, मेट्रो पार्क, प्लेअर्स अशा चित्रपटातून काम केले.
पण आता ओमीने आपल्या मातृभाषेत काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात ओमी मराठीतून बोलताना दिसणार आहे. अर्थात त्याच्या मराठी भाषेचा टोन हटके असल्याने हा चित्रपट पाहायला गंम्मत वाटणार आहे. चित्रपटाच्या टिझरमध्ये मराठी भाषा शिकण्यासाठीची त्याची धडपड प्रेक्षकांनी पाहिली आहे. त्यामुळे ही धमाल अनुभवण्यासाठी त्याने आमचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा अशी विनंती केली आहे.