कलाकारांना आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर करण्याचे काम आजवर बऱ्याचशा मालिकेने केलेले आहे. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो देखील त्यातलाच एक म्हणावा लागेल. गेली ८ वर्षे या शोने प्रेक्षकांचे तर मनोरंजन केलेच आहे मात्र या शो तील कलाकारांना हक्काचे घर घेण्यापर्यंत त्यांना आर्थिक पाठबळ मिळवून दिले आहे. भारत गणेशपुरे, निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके अशा कलाकारांनी मुंबईत हक्काचं घर खरेदी केलेलं आहे. या यशाच्या प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाचीही साथ मिळाली आहे. कुशल बद्रिके नेहमी त्याच्या स्ट्रगल काळाच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आज त्याची पत्नी सुनायनाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुशलने एक खास पोस्ट लिहिली आहे जी सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कुशल या पोस्टमध्ये म्हणतो की, संसार म्हंटल की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब. आता हिशोब लावला, तुझ्या-माझ्या नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी! आपल्या पहिल्या घराचं booking करण्यासाठी तुझी एकमेक असलेली policy मोडली होती आपण. आता पुन्हा नवीन घर घेता येईल, पण “ती वेळ” परत करण्याची policy अजून कोणत्याच company कडे नाही बघ. एका दसऱ्याला “झेंडूची फूलं” परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय.

आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू? सांग! अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं, संक्रांतीला काळी साडी नेसायची अश्या सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला. पण तुझा अवघा जन्म माझ्या “व्यथा” जपण्यात गेला यार. आता परवा परवाचीच गोष्ट नाही का? mental stress च्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठी वरून हाथ फिरवत बसली होतीस. ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी? माझ्या साठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवां पलिकडे काहीही देता येणार नाही मला. sorry आणि happy birthday सुकून.