शेहजादा, मसुटा, गुठली, मै राजकपूर हो गया, इमेल फिमेल, मर्दानी, पप्पू कांट डान्स साला. घंटा, आमिर, थँक्स माँ, अ पेइंग घोस्ट या आणि अशा कितीतरी हिंदी, मराठी चित्रपटातून कांचन पगारे यांनी आपल्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. एवढेच नाही तर नामवंत जाहिरात क्षेत्रातही कांचन पगारे यांनी प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. सध्या कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतून ते बबली सरांची भूमिका गाजवत आहेत. कांचन पगारे मराठी सृष्टीपेक्षा हिंदी चित्रपटात आणि जाहिरात क्षेत्रात जास्त रमले आहेत. अभिनय क्षेत्रातील त्यांचा यशाचा आलेख चढताच राहिला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या चाहत्यांच्या आणि फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात कांचन पगारे यांनी बीएमडब्ल्यू गाडीचा फोटो शेअर केला होता. ह्या फोटोसोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शन दिले होते. मात्र हे कॅप्शन इंग्लिशमधून लिहिल्याने अनेकांनी ते वाचण्याचा कंटाळा केला. फोटो सोबत त्यांनी म्हटले होते की, शेवटी मी स्वप्न सत्यात उतरवले त्याबद्दल देवाचे लाख लाख आभार. त्यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव केला. माझ्या आई वडिलांचे खूप खूप आभार की मी माझ्या आयुष्यात इतके मोठे यश मिळवले. कारण माझे कष्ट आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इंटरनेट कनेक्शन मिळवू शकलो आणि हे चित्र डाउनलोड करून इथे पोस्ट करू शकलो, धन्यवाद. कांचन पगारे यांचा मिश्किल स्वभाव या पोस्टमधून त्यांच्या काही चाहत्यांना समजला. मात्र काही जणांनी पोस्ट न वाचताच गाडी घेतल्याचे समजून अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
याची दखल घेत आज पुन्हा एकदा वाचाल तर वाचाल असे म्हणत कांचन यांनी चाहत्यांची कानउघडणी केली आहे. वाचाल तर वाचाल, हे त्रिकालाबादित सत्य आहे. काही दिवसांपूर्वी मी बीएमडब्ल्यूचा फोटो पोस्ट केला होता. पोस्ट सोबत चार ओळी देखील लिहिल्या होत्या. पण माझ्यावरच्या प्रेमामुळे म्हणा किंवा फोटोमुळे कित्येकांनी पोस्ट नीट वाचलीच नाही. आणि न वाचताच मला अभिनंदनाचे अनेक रिप्लाय आले. हे असं होणं घातक आहे असं मला वाटतं. दृश्य किंवा चित्र बघून त्यावर मत बनवणं किंवा न वाचताचं व्यक्त होण्याची घाई करणं हे आजकाल नित्याचचं झालंय किंवा आपल्या सवयीचं होत चाललयं. या आणि अश्याच गोष्टींमुळे “फेकन्यूज” ची चलती वाढलीये. “शब्दछलाच्या” जाळ्यात आपण अडकत चाललोय. आपण वर्तमान साक्षर असलो तरी सजग, जागरूक आणि सुशिक्षित आहेत.
यासाठी प्रत्येक फोटो किंवा पोस्ट, मग तो राजकिय, सामाजिक किंवा विनोदी असो आपण नीट वाचलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे नाहीतर आपली फसवणूक ठरलेली आहेच. समाजमाध्यमांवर आलेले चिन्ह, चित्र किंवा दृष्य आपण सजगतेने वाचायला, निरिक्षण करायला शिकलं पाहिजे. जेणेकरून अफवा पसरणार नाहीत. आपलं आणि इतरांचं नुकसान होणार नाही. असो तुमच्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी, आशिर्वादांसाठी शत:श ऋणी आहे आणि राहील. पोस्ट थोडी मोठी आहे पण तुम्ही ती पूर्ण वाचाल ही माफक अपेक्षा करतो, धन्यवाद. असे म्हणत ‘फोटो फक्त प्रतिकात्मक आहे, मला ही वाचावं लागेलचं खूप आणि तसा प्रयत्न नक्की करेल मी’. हेही त्यांनी पुढे अधोरेखित केले आहे.