बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी ९ वाजता निधन झाले आहे. ३१ मे रोजी गुफी पेंटल यांना हृदया संबंधीचा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आढळून आले मात्र काही वेळातच प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज सकाळीच त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. कालच ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांच्या निधनाच्या बातमीने अवघी सृष्टी हळहळली होती.
आणि आज गुफी पेंटल यांच्या निधनाच्या बातमीने कलासृष्टीतील एकेक तारा निखळत चाललाय अशी भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गुफी पेंटल यांचा अल्पसा परिचय जाणून घेऊयात. गुफी पेंटल यांचे खरे नाव सरबजीत सिंग पेंटल असे आहे. लहानपणापासून अभिनयाकडे त्यांचा ओढा होता, भाऊ कंवरजीत सोबत लहानपणी ते नाटकातून काम करायचे. आपल्या मुलाने अभियंता व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर बिहारमधील जमशेदपूर येथील टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह फर्ममध्ये त्यांनी काम केले होते. चीन युद्धामुळे संरक्षण आणीबाणीच्या काळात गुफी पेंटल सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर मुंबईतील टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह शाखेत त्यांची बदली करण्यात आली.
इथूनच अभिनयाचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. १९७८ सालच्या दिल्लगी चित्रपटातून त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. याच काळात त्यांनी बॉलिवूड चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाचा जम बसवला होता. महाभारत मालिकेतील शकुनी मामाच्या भूमिकेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. शकुनी मामाची विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केली. चित्रपट, मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. महाभारत मालिकेच्या सहकलारांनी या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. चित्रपट सृष्टी तसेच टेलिव्हिजन जगतातील जाणकार वरिष्ठ मंडळींनीही गुफी पेंटल यांच्या निधन वार्तावर दुःख व्यक्त केले आहे.