गेल्या काही दिवसांपासून मराठी सृष्टीतील कलाकारांनी लग्न सोहळ्याचा घाट घातलेला पाहायला मिळतो आहे. येत्या काही दिवसात स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे, त्याची खास मैत्रीण रुचिका धुरी सोबत लग्नाची गाठ बांधत आहे. आकाशच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र लग्नाची तारीख त्याने गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र येत्या काही दिवसातच त्याचे थाटात लग्न पार पडत आहे. आता आकाश अगोदर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजेच अभिजित श्वेतचंद्र होय.
अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वर्दे यांच्या लग्नाच्या अगोदरच्या विधीला सुरूवात झालेली आहे. आज त्यांच्या हळदीचा सोहळा थाटात पार पडलेला आहे. हळदी सोहळ्यातील काही खास क्षण त्याने शेअर करताच दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्या लग्नसोहळा थाटात पार पडणार असून मराठी सेलिब्रिटी लग्नाला उपस्थित राहणार आहेत. अभिजीतने नवे लक्ष्य मालिकेत इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाड ही भूमिका साकारली होती. ११ जून २०२२ रोजी अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वर्दे यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. साखरपुड्यानंतर जवळपास ८ महिन्यांनी दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. वडील चंद्रकांत भगत आणि आई श्वेता भगत यांचे नाव आपल्या नावासमोर लावतो. आपल्या यशामागे आईवडिलांचे श्रेय खूप मोठे आहे असे तो म्हणतो. अभिजित मूळचा अलिबाग रायगड जिल्ह्यातला.
मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिजीतने खाजगी कंपनीत नोकरी केली होती. मात्र नोकरीत फारसे मन रमेना म्हणून त्याने अभिनय हे आपले आवडते क्षेत्र असे म्हणून या क्षेत्रात येण्याचे ठरवले. स्ट्रगल करून त्याने नाटकातून स्वतःची ओळख निर्माण केली. मोहें पिया हे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक. तालीम हा त्याने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. चित्रपटानंतर अभिजीतला मराठी मालिकांमधून झळकण्याची संधी मिळाली. बापमाणुस, बाजी, गणपती बाप्पा मोरया, साजणा या मालिकांमधून अभिजित महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. त्याने चाफेकर ब्रदर्स, रेड सारख्या हिंदी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नवे लक्ष्य मालिकेतून त्याने साकारलेली डॅशिंग इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
अभिजितची होणारी पत्नी सेजल वर्दे ही देखील अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. २०१७ साली सेजलने रायगड क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. त्याच वर्षी तिने मिस लोणावळा बनण्याचा मानही पटकावला आहे. तर २०१८ साली मिस बेस्ट स्माईल फॅशनिस्ट आणि मिस अलिबाग असे पुरस्कार तिने मिळवले होते. २०१९ साली मुलुंड क्वीन या सौंदर्य स्पर्धेत तिने मिस कॉन्फिडन्ट होण्याचा मान पटकावला आहे. सेजलने मॉडेलिंग क्षेत्रातही आपलं नाव कमावले असून काही साड्यांच्या ब्रॅण्डसाठी तिने मोडेलिंग केलं आहे. एवढेच नाही तर आई तू एकविरा या म्युजिक व्हिडीओमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. उद्या पार पडणाऱ्या अभिजित आणि सेजलच्या लग्नसोहळ्याला कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची उत्सुकता आहे.