बॉलिवूड मध्ये एका रात्रीत सुपरस्टार बनण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. एकाच चित्रपटामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचता मात्र त्यानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही असे अनेक कलाकारांच्या बाबतीत झालेले दिसते. एक हिट चित्रपट दिलेले कलाकार कालांतराने नामशेष होतात आणि शारीरिक व्याधींमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा मिडियासमोर येतात. मात्र त्यांना पुरेशी मदत किंवा काम मिळतेच याची शाश्वती देता येत नाही.
यात आशिकी चित्रपट फेम “अनु अग्रवाल” हिच्याही नावाची चर्चा पाहायला मिळते. १९९० सालच्या आशिकी चित्रपटामुळे अभिनेत्री “अनु अग्रवाल” आणि अभिनेता “राहुल रॉय” एकाच रात्रीत सुपरस्टार झाले होते. खरं तर चित्रपटाचे कथानक आणि त्यातील सुपरडुपर हिट ठरलेली गाणी यांच्यामुळे हा चित्रपट तुफान हिट झाला होता. आजही या चित्रपटाची गाणी लोकप्रियतेच्या यादीत पुढे असलेली पाहायला मिळतात. मात्र या एका हिट चित्रपटानंतर हे दोन्ही कलाकार सफसेल फ्लॉप ठरलेले दिसले. राहुल रॉय ने काही चित्रपट साकारले मात्र मध्यंतरी तो अभिनय क्षेत्रापासून दूर गेला पण काही वर्षांपूर्वी पुन्हा नव्याने त्याने बॉलिवूड मध्ये कमबॅक केलेले दिसले. तसे अनुच्या बाबतीत मुळीच घडले नाही. अनु अग्रवालने किंग अंकल, खलनायिका, राम शास्त्र, सनम हरजाई असे मोजके चित्रपट केले मात्र म्हणावे तसे यश न मिळाल्याने तिने अभिनयातून काढता पाय घेतला. त्यानंतर आश्रमात राहून अध्यात्मिकतेकडे ती वळलेली दिसली. यादरम्यान १९९९ साली तिच्या गाडीला मोठा अपघात झाला.
या अपघातामुळे अनु जवळपास २९ दिवस कोमामध्ये गेली होती. यापुढचं आपलं सर्व आयुष्य एकाकी घालवण्याचा निर्णय तिने स्वीकारला. एका शांत ठिकाणी राहून काही दिवस ती एकाकी जीवन जगत होती. त्यावेळी तिला अध्यात्मची मोठी साथ मिळाली. परंतु काही वर्षांपासून ती पुन्हा लोकांमध्ये मिळू मिसळू लागली. लाईमलाईट पासून दूर गेलेली अनु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधताना दिसते. एवढ्या वर्षात तिच्यात झालेला हा मोठा बदल तिचे फोटो पाहिल्यावरच लक्षात येते. सध्या अनु मानसिक संतुलन ढासळलेल्या लोकांसाठी काम करत आहे. तिने स्वतःच्या नावाने फाऊंडेशन उभारले असून त्यातून अशा लोकांच्या उपचारासाठी मदतीचे कार्य करताना दिसत आहे. स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर तिने पुस्तक देखील लिहायचे ठरवले आहे.