मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आता अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे समोर आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील एक दोन वर्षे मी अभिनयातून ब्रेक घेत आहे असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जाहीर केले आहे. किरण राव सोबतचा घटस्फोट आणि अभिनेत्री फातिमा सना शेख सोबतच्या अफेअरच्या चर्चा. सोबतच लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला होणारा विरोध असो वा भारतात सुरक्षित वाटत नाही अशा केलेल्या वक्तव्यांमुळे आमिर खान सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत होता. चॅम्पियन्स हा त्याचा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे.

लाल सिंह चड्ढा चित्रपटानंतर चॅम्पियन्स या चित्रपटाच्या शूटिंगला तो सुरुवात करणार होता. सद्य परिस्थिती पाहता चित्रपटा निमित्ताने दिल्लीत एक पत्रकार परिषद भरवण्यात आली. यात आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट केले. गेल्या ३५ वर्षांपासून मी सतत चित्रपटातून काम करत आहे. या सततच्या कामामुळे मला बाहेरच्या गोष्टी जाणून घेता येत नाहीत. माझ्या जवळच्या व्यक्तींना देखील मी वेळ देऊ शकत नव्हतो. चॅम्पियन्स चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार होतो. पण आता या चित्रपटाचा केवळ निर्माता म्हणून काम करणार आहे. आमिर पुढे असेही म्हणाला की, अभिनयाच्या कारकीर्दीतून ब्रेक घेत असलो तरी, निर्माता म्हणून जबाबदारी बजावताना दिसणार आहे. आईला आणि मुलांना वेळ देऊ शकलो नव्हतो, आता हा वेळ त्यांच्यासोबत घालवण्याचे ठरवले आहे.

त्यासाठी किमान एक दोन वर्षे तरी अभिनयापासून दूर राहणार आहे. चॅम्पियन्स चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्याची शोधाशोध सुरू असून याबाबत लवकरच खुलासा केला जाईल. आमिर खानची छोटीशी भूमिका असलेला सलाम वेंकी हा आगामी चित्रपट ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काजोल आणि आमिर खान पुन्हा एकदा चित्रपटातून स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ईश्क चित्रपटातून दोघेही एकत्र झळकले होते. अर्थात काजोल त्याची नायिका नव्हती, तरी या दोघांनी एकत्र काम केलेले पाहायला मिळाले. मात्र या चित्रपटानंतर आता तो काही वर्षे अभिनयापासून बाजूला होणार असल्याने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार आहे. आमिरच्या या निर्णयामुळे नवीन कोणत्या कलाकाराला ही संधी मिळेल असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.