’जडतो तो जीव, लागते ती आस…’ हे आभाळमाया मालिकेचं शीर्षक गीत आजही ऐकलं की आपसूकच डोळ्यात पाणी तरळतं… ही या मालिकेची खरी ओळख म्हणावी लागेल. मराठी खाजगी वाहिनीवरील सर्वात गाजलेली पहिली वहिली मराठी मालिका म्हणून आभाळमाया ह्या मालिकेने आपले नाव नोंदवलं आहे. सलग तीन वर्षे ह्या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते हे विशेष. आजकालच्या मालिकांमधून वास्तवाचे दर्शन होत नाही, मूळ कथानकाला अनेक फाटे देण्याचा प्रयत्न केला जातो असे म्हटले जाते त्यामुळे वास्तवाशी निगडित असणाऱ्या पूर्वी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या आणि तशाच धाटणीच्या मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळोत अशीच एक मागणी आता चोखंदळ प्रेक्षक करीत असतात.
आभाळमाया मालिकेचे शीर्षक गीत तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. आभाळमायाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या मालिकेतील कलाकार तब्बल दोन दशकांनी पुन्हा एकदा एकत्र आले होते. आज मालिकेला प्रसारित होऊन २१ वर्षे लोटली आहेत त्यातील या बालकलाकार आता कशा दिसतात ते जाणून घेऊयात. मालिकेत सुकन्या मोने यांनी सुधाची भूमिका तर मनोज जोशी यांनी शरदची भूमिका साकारली होती. सुधा आणि शरद यांना आकांक्षा आणि अनुष्का या दोन मुली दर्शवल्या होत्या. आकांक्षाची भूमिका अभिनेत्री परी तेलंग हिने साकारली होती तर अनुष्काची भूमिका “ऋचा पाटकर” हिने साकारली होती. मालिकेतील बरेचशे कलाकार जसे की सुकन्या मोने, मनोज जोशी, हर्षदा खानविलकर, संजय मोने, परी तेलंग, अंकुश चौधरी आजही हे कलाकार अभिनय क्षेत्रात आपले पाय रोवून आहेत परंतु ऋचा पाटकर या मालिकेनंतर कुठल्याच मालिकेत किंवा चित्रपटात फारशी पाहायला मिळाली नाही.
मालिकेत अनुष्काची भूमिका साकारलेली ऋचा पाटकर मूळची मुंबईची. रामणारायन रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण तिने पूर्ण केले. ऋचाला नृत्याची देखील विशेष आवड, देशविदेशातील दौरे करून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन तिथली संस्कृती जाणून घेणे व त्याबद्दल लिहिणे ऋचाला आवडते. शिवाय वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखणे आणि ते स्वतः बनवणे ही तिचा छंद. इन्स्टाग्रामवर यासंदर्भात सतत माहिती शेअर करत असते. ऋचाचे वडील ज्ञानराज पाटकर हेही एक उत्तम कलाकार आहेत. काही टीव्ही मालिका तसेच नाटकांतून त्यांनी कामे केली आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून ती मराठी मालिकेत झळकली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. या एका मालिकेने अभिनयाशी ओळख झालेली ऋचा पुढे जाऊन मात्र अलगद बाजूला झाली. परंतु एक बालकलाकार म्हणून तिची नेहमीच आठवण काढली जाणार हे नक्की…