झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. एक सामान्य गृहिणी ते घर सांभाळणारी कर्तृत्ववान स्त्री अशा भूमिकेतून ही अश्विनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे. दीपा परब हिने अश्विनीची भूमिका साकारली असून या मालिकेत आता कार्तिकीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. कार्तिकीचा जीव धोक्यात असल्याने विद्युत तीला अश्विनीच्या घरी घेऊन येतो. त्यामुळे अश्विनीसमोर आता एक मोठे आव्हान उभे राहणार आहे.

कार्तिकीच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे श्रद्धा पोतदार. श्रद्धा ही मॉडेल तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे. २०१९ सालच्या मिसेस कळवा मध्ये सहभागी झाल्यानंतर तिने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मिसेस परफेक्ट महाराष्ट्र, मिसेस रायगड, मिसेस फॅशन आयकॉन, मिसेस एनडीज वर्ल्ड अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये तिने बक्षिसं मिळवली आहेत. मन बावरा या हिंदी व्हिडीओ सॉंगमध्ये श्रद्धा प्रमुख भूमिकेत झळकली होती. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेत श्रद्धाने बाळू मामाच्या बहिणीची म्हणजे गंगाची भूमिका साकारली होती. नवे लक्ष, क्रिमीनल्स अशा विविध मालिका तसेच जाहिरात क्षेत्रातही श्रद्धाने यश मिळवले आहे.

अभिनेत्री दीपा परब, वैष्णवी कल्याणकर, धनश्री कडगावकर, पिहू गोसावी. सोबत आदित्य वैद्य, रयांश जुवाटकर, राज मोरे, देवेंद्र दोडके, ध्रुव दातार अशी भली मोठी स्टार कास्ट लाभलेली मालिका प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. नवनवीन आव्हानांना निकराने तोंड देणारी अश्विनी सर्वांची लाडकी झाली आहे. तू चाल पुढं या मालिकेत श्रद्धाची नुकतीच एन्ट्री झाली असून विद्युत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला पाहायला मिळतो आहे. विद्युत आणि कार्तिकी यांची जवळीक वाढताना पाहायला मिळणार असल्याने शिल्पीची यावर काय रिऍक्शन असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता मालिकेत लवकरच आंखणी रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.