खुपते तिथे गुप्ते च्या ह्या आठवड्याच्या भागात नितीन गडकरी हजेरी लावणार आहेत. नितीन गडकरी या शोमध्ये आल्यानंतर राजकारणातील अनेक गुपितं उलगडणार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते त्यावेळी नितीन गडकरी त्यांच्या भेटीला गेले होते. या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. बाळासाहेबांचे माझ्यावर प्रेम होते असे नितीन गडकरी यावेळी म्हणतात. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा नितीन गडकरी यांच्याशी बोलताना बाळासाहेब म्हणाले होते की, तुम्ही राज आणि उद्धवला एकत्र आणा. बाळासाहेबांची ही ईच्छा मी उद्धव जवळ बोलून दाखवली होती.
मी तसे प्रयत्न सुद्धा केले मात्र मला त्यात यश मिळाले नव्हते असे नितीन गडकरी म्हणतात. राज ठाकरेंबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांचं मोठं कौतुक केलं. राज ठाकरे हे कलात्मक व्यक्तिमत्त्व आहे. मी त्यांच्या नव्या घरात भेट घेतली तेव्हा त्यांच्या घराचे इंटेरिअर मी पाहिले. सगळ्या गोष्टी अगदी विचारपूर्वक आणि आखीव रेखीव होत्या. त्यांच्यातील विचार करण्याची क्षमता जास्त आहे. राजकारण आणि मैत्री या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नितीन गडकरी हे अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन आहेत. एकदा त्यांना एक फोन आला समोरून मै अमिताभ बच्चन बोल रहा हूँ असं म्हटलं. तेव्हा कोणीतरी आपली मस्करी करतंय असे समजून ‘ए नाटक मत कर रख फोन नीचे’ असे म्हणून नितीन गडकरी यांनी फोन कट केला.
थोड्या वेळात पुन्हा फोन आला आणि नितीन गडकरीजी मी खरंच अमिताभ बच्चनच बोलतोय असे ते म्हणाले. तेव्हा नितीन गडकरी यांनी त्यांची माफी मागितली, मला वाटलंच नाही तुम्ही कधी मला फोन कराल. तेव्हा बच्चन यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं मोठं कौतुक केलं. ते म्हणाले की मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून आलो आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही खूप चांगला रस्ता बनवला. तेव्हा नितीन गडकरी यांनी त्यांच्या चित्रपटाच्या काही आठवणी सांगितल्या. मी थर्ड क्लासमध्ये बसून तुमचे चित्रपट पाहिले होते. दिवार ३ वेळा तर आनंद ८ वेळा पाहिला. तुमचे फायटिंग करण्याचे सिन खूप आवडायचे. तेवढ्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबवलं आणि फिल्मची गोष्ट सोडा.
एक चित्रपट जर चालला तर लोकं वर्षभर त्याला लक्षात ठेवतात. जर गाणी चांगली असतील तर दोन वर्षे लक्षात ठेवतील पण मुंबईवाले तुम्हाला जन्मभर लक्षात ठेवतील. कारण ते रोज तुम्ही बनवलेल्या फ्लायओव्हर वरून जातात तेव्हा वेळ खूप वाचवला आणि ट्राफिकपासून मुक्ती मिळवून दिली म्हणून ते तुम्हाला १०० वर्षे लक्षात ठेवतील. अशा शब्दांत बच्चन यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.