सोशल मीडिया स्टार आणि बालकलाकार साईशाची आई पूजा भोईर हिला आर्थिक फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ७ जुलै पर्यंत पूजा भोईरला कोठडी सुनावली असून, पती विशांत भोईर अजूनही फरार असल्याचे सांगितले जाते. पूजा भोईर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध भागातील लोकांशी ओळख बनवून अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. लोकांना स्कीममध्ये पैसे गुंतवल्यानंतर पूजा भोईर त्यांना चांगला परतावा मिळवून देत होती. लवकर मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापोटी अनेक जणांनी पूजा भोईरवर विश्वास ठेवून अधिकची रक्कम गुंतवली होती.
पण हे पैसे परत मिळत नसल्याचे कळताच पूजा भोईर विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पूजा भोईरच्या मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आली. तिच्याकडे २७ लाखांचे दागिने, बँकेच्या खात्यात ३ कोटी हून अधिक रुपये आणि आलिशान फ्लॅट तसेच महागड्या गाड्या असल्याचे उघड झाले. पूजाने ज्या ज्या लोकांशी आर्थिक व्यवहार केला होता ती बँकेची सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी पूजा भोईरच्या सासरकडच्या मंडळींची सुद्धा भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आम्ही पूजाला या व्यवसायात पडू नकोस असा सल्ला दिला होता. पण तिने तो ऐकला नाही आणि आमच्या बोलण्याकडे तिने दुर्लक्ष केलं.
दरम्यान पूजा भोईर साईशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. साईशा भोईर ही बालकलाकार आहे, नवा गडी नवं राज्य मालिकेच्या अगोदर गण गण गणपती आणि रंग माझा वेगळा मधून झळकण्याची तिला संधी मिळाली होती. याही अगोदर सोशल मीडियावर तिने मोठी प्रसिद्धी मिळवली होती. याच माध्यमातून पूजा भोईरने लोकांची ओळख बनवून, सुरुवातीला पैशांचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. मे महिन्यात पूजा विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. तर नवरा विशांत भोईर फरार असल्याने नवा गडी नवं राज्य या मालिकेतून साईशाची एक्झिट करण्यात आली आहे. सध्या साईशा तिच्या आजीकडे राहत असल्याचे बोलले जाते.