स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेत मंजुळा आल्यापासून रंजक घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. मंजुळाच्या येण्याने मोनिका सुद्धा आता गप्प झाली आहे. पिहू मल्हारची मुलगी नसल्याचे गुपित मंजुळाला समजले आहे. त्यामुळे इतके दिवस मंजुळाला त्रास देणारी मोनिका आता मंजुळाच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्यामुळे डॅशिंग आणि रोखठोक मंजुळा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अर्थात मंजुळा ही वैदेहीच आहे पण अपघातानंतर तिचा मृत्यू न होता स्मृती गेली असल्याचे दाखवण्यात आले आहे. नुकतेच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांची एन्ट्री झाली आहे.
उषा नाईक मंजुळाच्या आईची भूमिका साकारत आहेत. मंजुळाबाबतचं सत्य आता त्या उलगडताना पाहायला मिळत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त मालिकेत एक रंजक ट्विस्ट दाखवण्यात आला. स्वरा मल्हारला विठुरायाच्या मंदिरात घेऊन येते. इतके दिवस तोंड लपवून वावरणारी मंजुळा विठुरायाच्या मंदिरात मल्हार समोर आलेली दाखवली आहे. मंजुळाला समोर पाहून ही वैदेहीच आहे असे म्हणत तो मंजुळाची विचारपूस करण्याचा प्रयत्न करतो. पण मल्हार आपल्याला वैदेही का म्हणतो याचे गुपित जाणून घेण्यासाठी ती आईकडे जाते. इथे आता मंजुळाला तिच्या पूर्वायुष्यातील घटनांचा उलगडा होणार आहे. इतके दिवस रेंगाळलेली मालिका कधी नव्हे ते सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
पिहू मोनिका यांच्यातील अनपेक्षित समीकरण, येणारे नवनवीन ट्विस्ट यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिकेतले हे बदल प्रेक्षकांनाही हवेहवेसे आहेत. या अनोख्या ट्विस्टमुळे मालिका अधिक रंजक होत चालली आहे. मंजुळा विस्मृतीतून बाहेर येऊन ती वैदेही असल्याचे समजल्यानंतर मल्हारला स्वराचे देखील गुपित लवकरच कळेल अशी आशा प्रेक्षकांना आहे. मात्र आता ही मालिका सुरळीत सुरू झाली आहे त्यात लेखकाने विघ्न आणू नये अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. कारण आता वैदेही समोर आल्यानंतर मोनिका तिची खेळी खेळणार असे लेखकाला अपेक्षित असणार. लेखकाने आता जास्त विघ्न न आणता, मालिका फार रेंगाळत न ठेवता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यावा एवढीच माफक मागणी केली जात आहे.