१९८८ साली पंढरीची वारी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्षे झाली आहेत. मात्र आजही या चित्रपटाची जादू कुठेही कमी झालेली नाही. आज आषाढी एकादशीनिमित्त कलर्स मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रसारित करण्यात आला आणि प्रेक्षकांनी तो तेवढ्याच आपुलकीने पाहिला. या चित्रपटाची एक आठवण अशी होती की हा चित्रपट जयश्री गडकर यांच्या अगोदर रंजना साकारणार होत्या. रंजनाची प्रमुख भूमिका असताना या चित्रपटाचे जवळपास ७० टक्के चित्रीकरण पार पडले होते. मात्र दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.
या अपघातात रंजना यांना गंभीर दुखापत झाली आणि त्या अंथरुणाला खिळल्या. चित्रपटाचे निर्माते अण्णासाहेब घाटगे यांना कुठल्याही परिस्थितीत रंजनालाच घेऊन हा चित्रपट पूर्ण करायचा होता. कारण हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेब घाटगे यांनी जवळचे होते नव्हते तेवढे १८ लाख रुपये खर्च केले होते. चित्रपट पूर्ण होण्यासाठी ते रंजनाच्या बरे होण्याची वाट पाहत होते. पण जेव्हा दोन वर्षाने रंजना कधीच चालू शकणार नाही हे अण्णासाहेब घाटगेना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विठुरायासाठी अण्णांना हा चित्रपट पूर्ण करायचाच होता. शेवटी रंजनाची परवानगी घेऊन ती भूमिका त्यांनी जयश्री गडकर यांना देऊ केली. रंजना आणि बकुल कवठेकर यांचा एकत्रित असलेला फोटो चित्रपटाच्या पोस्टरवर फायनल करण्यात आला होता.
पंढरीची वारी चित्रपटाचे नियोजित पोस्टर पुन्हा बदलण्यात आले. आणि चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा एकदा नव्याने सुरू केले. जयश्री गडकर, बकुल कवठेकर, बाळ धुरी, अशोक सराफ, नंदिनी जोग, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, बाळ धुरी अशा मातब्बर कलाकारांना घेऊन हा चित्रपट पूर्णत्वास आला. चित्रपटातील जयश्री गडकर यांच्या अभिनयाला तोड नव्हती, मात्र रंजनाने हा चित्रपट केला असता तरीही भूमिका तोडीसतोड ठरली असती. चित्रपटातील बालकलाकार बकुल कवठेकर याच्या मुकाभिनयाला अनेकांनी दाद दिली. भोळ्या भाबड्या पण तितक्याच उठावदार भूमिकेने चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी बकुल मात्र प्रेक्षकांना रडवुन जातो. ह्या आठवणी अविस्मरणीय आहेत आणि त्या कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतील.