आपल्या सहजसुंदर अभिनयाने भरत जाधव हा मराठी सृष्टीतील सुपरस्टार अशी ओळख मिळवताना दिसला. नाटकपासून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू करणाऱ्या भरत जाधवला अंकुश आणि केदार सारखे हिरे मित्र म्हणून लाभले. क्रांती रेडकर सोबत त्याने नाटकातून चित्रपटातून एकत्रित काम केले. भरतच्या स्ट्रगलच्या काळातील हे मित्र त्याचे साक्षीदार होते. एकदा एका कार्यक्रमात भरत जाधवच्या स्ट्रगल बद्दल बोलताना क्रांतीने त्या प्रसंगाची आठवण करून देताच भरत भावुक झालेला पाहायला मिळाला. नाटकाच्या प्रयोगावरून परतत असताना बाकीचे कलाकार बसमध्ये झोपलेले होते. पण भरतला त्या दिवशी झोप येत नव्हती, तो काहीतरी विचार करत असावा असे क्रांतीला वाटले.
क्रांतीलाही झोप येत नसल्याने तिने भरतला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. भरत जाधवचे वडील हे मुंबईत टॅक्सी चालवत होते. भरत त्यावेळी नाटकातून आपला जम बसवू पाहत होता. त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती. मुलांनी आपल्याकडे हट्ट करावा त्याला पाहिजे ते मिळवून द्यावं या गोष्टी फार लांबच असायच्या. सुरभी खूप लहान होती. ती त्याच्याकडे काही ना काही तरी वस्तू मागायची. तेव्हा भरत दरवेळी तिला ‘आपण हे उद्या घेऊ’ असे म्हणून तिची समजूत घालायचा. अनेकदा असे घडल्यानंतर एक दिवस सुरभी स्वतःहून म्हणाली, बाबा आपण हे उद्या घेऊ. सुरभीच्या या एका वाक्याने भरतच्या मनात दिवसभर कालवाकालव झाली. आपली मुलगी आपली परिस्थिती पाहून अशी म्हणाली एवढी तिला समज आलेली पाहून भरतला त्या रात्री झोपच आली नव्हती.
हे पाहून क्रांती त्याला म्हणाली होती की, भरत बघ एक ना एक दिवस आपला हा स्ट्रगल संपलेला असेल. तू मोठा स्टार बनशील आपल्याकडे खूप पैसे येतील. भरतचा सुपरस्टार होण्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्यानंतर मात्र अथकपरिश्रमातून भरतचे नशीब पालटले. नाटक, चित्रपट असे एकापाठोपाठ एक कामं मिळत गेली. सुपरस्टार बनण्यापर्यंत त्याने मजल मारली. एवढेच नाही तर मराठी इंडस्ट्रीत पहिली व्हॅनिटी व्हॅन घेणारा कलाकार म्हणून त्याने आपल्या नावावर शिक्का मारला होता. आपले पाय जमिनीवरच असावेत म्हणून त्या व्हॅनिटी व्हॅन मधल्या आरश्याच्या कपाटाच्या आत त्याने टॉक्सिचा फोटो लावला होता. जेणेकरून कपडे उतरवून झाल्यावर आपण आपले पूर्वीचे दिवस विसरू नये.