२८ एप्रिल रोजी महाराष्ट्र शाहीर आणि टीडीएम हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळवून दिला मात्र दुसऱ्याच बाजूला टीडीएम चित्रपटाला प्राईमटाइम शो मिळणे कठीण झाले. थिएटर मालक टीडीएम चित्रपटाला शो मिळवून देत नाहीत हे पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांना रडू कोसळले. प्रेक्षकांना विनवणी करत आमच्या चित्रपटाला शो मिळवून द्या असे भाऊराव कऱ्हाडे माध्यमाशी बोलताना दिसले. भाऊराव कऱ्हाडे यांनी बबन आणि ख्वाडा या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले. टीडीएम हा चित्रपटही अशाच धाटणीचा आहे.
परंतु चित्रपट प्रदर्शित होऊनही शो मिळत नसल्याची खंत भाऊराव कऱ्हाडे यांनी यावेळी बोलून दाखवली. यावर सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या बाजूने आवाज उठवण्यास सुरुवात केली. प्रेक्षक आणि थिएटर मालक यांच्या संगनमताने आणि सहयोगानेच मराठी चित्रपट चालतील असा तर्क सगळीकडे आळवताना दिसला. सोबतच अभिनेता निर्माते प्रवीण तरडे यांनीही या वादात उडी घेतलेली पाहायला मिळाली. बलोच चित्रपट निमित्ताने प्रवीण तरडे कलाकारांसह एकत्रित जमले होते. त्यावेळी प्रवीण तरडेने टीडीएम चित्रपटाबाबत एक वक्तव्य केले. टीडीएम चित्रपटाला शो मिळत नाहीत हे पाहून मी स्वतः थिएटर मालकांशी बोललो आहे. आम्हाला तुम्ही जसा सपोर्ट करता तसा सपोर्ट तुम्ही भाऊराव कऱ्हाडेला सुद्धा करावा अशी मी मागणी केली.
आता हिंदी चित्रपटही एवढे रिलीज झालेले नाहीत मग मराठी चित्रपटाला शो का मिळत नाहीत. मग मराठी चित्रपटामध्येच ही फाईट आहे का? महाराष्ट्र शाहीर आणि टीडीएम या दोघांमध्येच ही फाईट आहे का? असा प्रश्न त्यांनी इथे उपस्थित केला. दरम्यान चित्रपटाला शो मिळत नसल्याचे पाहून भाऊराव कऱ्हाडे यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा वाटत आहे परंतु शो मिळत नसल्याने मी हे प्रदर्शन थांबवतोय. अशी दिलगीरी व्यक्त करत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. मात्र यानंतर टीडीएम चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचे अपडेट्स वेळोवेळी देऊ असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिलेले पाहायला मिळाले.