झी मराठी वाहिनी आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. येत्या काही दिवसात वाहिनीने आपल्या मालिका प्रसारण वेळेतही मोठे बदल केले आहेत. दुपारी सुरू झालेल्या लवंगी मिरची आणि यशोदा गोष्ट श्यामच्या आईची या दोन मालिका अनुक्रमे रात्री १० वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहेत. या मालिकेच्या जागी म्हणजेच दुपारी १ वाजता महाराष्ट्राची किचन क्वीन हा नवीन शो संकर्षण कऱ्हाडे प्रेक्षकांच्या भेटीला घेउन येत आहे. तर सर्वांची लाडकी कथाबाह्य मालिका म्हणजेच होममिनिस्टर अर्धा तास आधी म्हणजेच ५.३० वाजता प्रसारित होणार आहे.
यासोबतच अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेला अवघ्या काही दिवसातच आपला गाशा गुंडाळावा लागत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी प्रेक्षकांना खुपते तिथे गुप्ते हा नवीन शो पाहायला मिळणार आहे. वाहिनीने हे केलेले बदल प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील अशी आशा आहे. कारण दुपारी प्रसारित होत असलेली यशोदा मालिका संध्याकाळी दाखवली जावी. जेणेकरून ती लहान मुलांनाही पाहता येईल अशी मागणी व्यक्त केली जात होती. प्रेक्षकांनी केलेल्या या मागणीचा विचार करून वाहिनीने हे मोठे बदल करण्याचे ठरवले आहे. यासोबतच आता झी मराठीवरील चला हवा येऊ द्या शोमध्येही मोठा बदल केला जाणार आहे. याअगोदर वेगवेगळे पर्व आणले गेले, त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
मात्र आता शोमध्ये बालकलाकारांनाही आमंत्रित केले जात आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मायरा सोबत आणखी बरेचसे बालकलाकार शोमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांना हसवणार आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर मायरा झी टॉकीजवरील मन मंदिरा गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसली. याचबरोबर मायराच्या नावाने ज्वेलरी ब्रँड बाजारात आणण्यात आला. त्यामुळे मायराचे नाव व्यवसाय क्षेत्रातही गाजले. आता पुन्हा एकदा मायरा चला हवा येऊ द्या च्या मंचावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. या नव्या शो निमित्त मायराला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.