स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. अर्थात मालिकेचे कथानक आणि त्यातील सहसुंदर अभिनय करणारी पात्र ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. अर्जुन, सायली, प्रिया, पूर्णा आजी, कल्पना अशा सर्वच पात्रांनी मालिकेत धमाल आणली आहे. मालिकेच्या सेटवर या कलाकारांचे बॉंडिंग खूप छान जुळून आलेले आहे, त्याचमुळे त्यांचे सिन अगदी चोख झालेले पाहायला मिळतात.
अर्जुन आणि सायलीच्या भूमिकेत असलेले अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्यात तर खूप छान गट्टी जमलेली आहे. एवढे दिवस एकत्रित काम केल्यानंतर या दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाबद्दल बरीचशी माहिती झालेली आहे. जुई अतिशय शांत आणि मोजकच बोलणारी आहे तिथेच अमित मात्र प्रचंड बडबडा आणि वातावरण हसतं खेळतं ठेवणारा आहे. या दोघांचे अनेक मजेशीर सिन होत असतात, मात्र हे सिन शूट होताना हे दोघे एकमेकांकडे कधीच पाहत नाहीत. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. या दोघांचे सिन शूट होताना चुकून जर दोघांची नजरानजर झालीच तर या दोघांनाही लगेचच हसायला येतं. जुईला प्रँक कधीच करता येत नाही, सेटवर अमितचा चष्मा बऱ्याचदा इथे तिथे पडलेला असतो, त्यामुळे जुई त्याचा चष्मा लपवण्यासाठी प्रयत्न करते.
पण आपला चष्मा जुईनेच लपवलाय हे अमितला पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे तो जुईकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावरूनच याचं गुपीत उघडं पडतं. जुईच्या मनात कधीच काही गोष्ट राहत नाही. सेटवरचं एखादं गुपित ती कोणासमोरही उघड करते, त्यामुळे तिला कुऱ्हाड असं म्हणून गप्प केलं जातं. त्यामुळे सेटवर जुईला कुऱ्हाड हे नाव पडलं आहे. या सगळ्या गमतीजमती सेटवर घडत असल्यानेच कलाकारांचे एकमेकांशी छान सूर जुळून आलेले पाहायला मिळतात. जुई अतिशय गुणी मुलगी आहे, तिला माणसं जमवायला खूप आवडतात. तिला प्राण्यांबद्दलही खूप आपुलकी आहे असं अमित म्हणतो, त्यामुळे तो जुईसाठी तशा नवऱ्या मुलाचा शोध घेत आहे.