चित्रपट मालिकेतील एक विशिष्ट पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहिलेले असते. या पात्राचे प्रेक्षकांना नाव आठवत नसले तरी तो चेहरा पाहिल्यानंतर त्याने निभावलेल्या भूमिकेबद्दल चर्चा केली जाते. २००३ साली आलेला मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट खूपच गाजला होता. संजय दत्त यांनी चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती. मात्र या मुन्नाच्या आसपास आलेली बरीचशी मंडळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसली. यातील स्वामीचे पात्र प्रेक्षकांना चांगलेच लक्षात राहिले होते. आज मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास २० वर्षे लोटली आहेत.
त्यामुळे हा स्वामी आता कसा दिसतो याची उत्सुकता निर्माण होते. चित्रपटात स्वामीची भूमिका अभिनेता खुर्शीद लॉयर याने निभावली होती. मुन्नाभाई चित्रपटाने खुर्शीदला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. अर्थात या चित्रपटानंतर खुर्शीद अनेक बॉलिवूड चित्रपटातून झळकला आहे. मात्र त्याचा वेगळा लूक पाहून अनेकांनी त्याला नीटसे ओळखले नाही. मिसेस या मिस, प्यारे मोहन, अजब प्रेम की गजब कहाणी, बुढ्ढा मर गया, कुछ लव्ह जैसा, गिप्पी, फुड्डू, डबल धमाल, हॅरी पुत्तर अशा अनेक चित्रपटातून खुर्शीद महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. मात्र त्याच्या बदललेल्या लुकमुळे हा तोच आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण मुन्नाभाई एमबीबीएस मधला खुर्शीद आणि आताच खुर्शीद यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे असेच मत व्यक्त होताना दिसते.
अनेकजण त्याला पाहून अवाक होत आहेत. खरं तर खुर्शीद हा रेडिओ जॉकी म्हणूनही काम करत होता. १९९९ साली त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या इंडस्ट्रीबद्दल त्याच्या मनात एक वेगळी इमेज तयार झालेली आहे. आपण इथे पैसे कमवायला आलो नाही असेही तो एका मुलाखतीत म्हणाला होता. या इंडस्ट्रीत एक विशिष्ट असा गट तयार झालेला आहे. यातून तुम्हाला अलगद बाजूला केलं जातं असं तो त्यावेळी म्हणाला होता. जेव्हा देशावर संकट आले तेव्हा खुर्शीदकडे कुठलेच काम नव्हते. यातून आपण सुरक्षित राहू याची तो विशेष काळजी घेत राहिला. पण कालांतराने त्याने या इंडस्ट्रीत कमबॅक करण्याचे ठरवले.