स्टार प्रवाहवरील बहुतेक मालिकांनी टीआरपीचा आलेख चढताच ठेवलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भेटीला ही वाहिनी नवनवीन मालिका आणू पाहत आहे. लवकरच सुरू होत असलेल्या नव्या मालिकेमुळे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मालिकेत आता काही दिवसांपासून सकारात्मक बदल होताना दिसू लागले आहेत. येत्या ८ मे पासून या मालिकेच्या जागी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका प्रसारित केली जात आहे. नुकताच मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेची नायिका ही विवाहित आहे, मात्र काही कारणास्तव ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहत आहे.
अर्थात सासर सोडल्यामुळे तिला माहेरीच राहावे लागत असल्याने माहेरच्या मंडळींकडून तिला आता त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागत आहे. अशातच ही नायिका ज्या ठिकाणी काम करते तिथेही तिला लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. मात्र कंपनीचा मालक या नायिकेची बाजू सांभाळून घेताना दिसतो. मन धागा धागा जोडते नवा मालिकेची नायिका आहे दिव्या पुगावकर. दिव्याने याअगोदर स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेत माऊची प्रमुख भूमिका साकारली होती. तिचा नव्या मालिकेचा सहनायक असणार आहे अभिषेक रहाळकर. अभिषेक रहाळकर याने स्वामिनी या लोकप्रिय मालिकेतून सदाशिव रावांच्या भूमिकेने मोठी प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर तो वैदेही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत तो सहाय्यक भूमिकेत चमकला.
मन धागा धागा जोडतो नवा मालिकेतून तो पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या आनंदीच्या पाठीशी तो सतत उभा राहताना दिसतो. दिव्या आणि अभिषेक यांची ही फ्रेश जोडी मालिकेतून प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून घेतील असा विश्वास आहे. या मालिकेच्या आगमनामुळे ठरलं तर मग मालिकेसमोर एक वेगळे आव्हान ठरणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. कारण ठरलं तर मग या मालिकेने आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या मालिकांना मागे टाकत सलग आठ आठवडे अव्वल स्थानावर नाव मिळवले आहे. तसेच ही आणखी एक नवी मालिका आल्यामुळे प्रेक्षकांचा कल कोणाकडे असणार हे पाहावे लागेल. तूर्तास दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर या फ्रेश जोडीला नवीन मालिकेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.