अनुप जगदाळे दिग्दर्शित आणि शशिकांत पवार निर्मित रावरंभा या आगामी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रावरंभा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा आहे. १२ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मोनालीसा बागल, ओम भूतकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर शंतनू मोघे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत आहे. चित्रपटात अशोक समर्थ, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, मयुरेश पेम, रोहित चव्हाण, अश्विनी बागल, पल्लवी पटवर्धन यासारखे ओळखीचे चेहरे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर कुशल बद्रिके प्रथमच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

कुशल रावरंभा चित्रपटातून कुरबतखानची भूमिका साकारत आहे. कुरबतखानच्या गेटअप मधला कुशलचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात कुशल बद्रिके आजपर्यंत विनोदी भूमीकातूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. अगदी त्याचा चित्रपट असो, नाटक किंवा चला हवा येऊ द्या सारखे रिऍलिटी शो या सर्वांमध्ये कुशल विनोदी अभिनेता म्हणून चमकला आहे. चला हवा हेऊ द्या शोमध्ये तो कधी अनिल कपूर, शिवाजी साटम तर कधी सनी देओलची मिमिक्री करताना दिसला. त्यामुळे तो कुठल्याही गेटअपमध्ये आला तरी अचानक मिमिक्री करायला लागेल असे वाटायला लागते. याच कारणामुळे कुशल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

रावरंभा चित्रपटात कुशल खलनायक साकारत असून गेटअपमध्ये त्याला पाहून प्रेक्षकांना हसायला येत आहे. कोण जाणे याच्या अंगात मिमिक्रीचं भूत शिरून अचानक तो अनिल कपूर बनून प्रेक्षकांना हसवेल. गमतीचा भाग सोडला तर कुशल एक गुणी अभिनेता आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण कुशल ही खलनायकाची भूमिका तेवढ्याच ताकदीने उभारेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. स्ट्रगलच्या काळात कुशलला त्याच्या पत्नीने खूप मोठा पाठिंबा दर्शवला होता. चला हवा येऊ द्या मुळे तर त्याला खरे यश मिळत गेले. त्यामुळे एक अभिनेता म्हणून खलनायकाच्या भूमिकेला कुशल योग्य न्याय देईल असा विश्वास वाटतो. भविष्यात त्याच्या अशा भूमिकांमुळे तो प्रेक्षकांच्या रोषाला नक्कीच सामोरा जाईल याची खात्री आहे.