उद्या ९ एप्रिल रोजी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात नाट्य सृष्टीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात महासन्मान होणार असल्याने प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. वंदना गुप्ते यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात लोकप्रिय नाटकांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सोहळा अधिक रंगतदार होणार आहे. निलेश साबळेने दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या भूमिकेचा गेटअप करून आठवणींना उजाळा दिला. दिलीप प्रभावळकर देखील त्याचा लूक पाहून भारावून गेले.
संकर्षण कऱ्हाडे कार्यक्रमात प्रशांत दामले यांच्या सोबत घडलेला एक कठीण प्रसंग या मंचावर शेअर करतो. प्रशांत दामले यांनी नाटकातून काम करण्याचा एक विक्रमच केलेला आहे. चार दिवस प्रेमाचे या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये निघाले असताना कोकणात बस जाणार त्याअगोदरच्या गावातील कॉन्ट्रॅक्टरने त्यांची गाडी बससमोर आडवी घातली. बसमधून उतरलेल्या प्रशांत दामले यांना त्यांनी सांगितलं की, तुझ्या बाबांची प्रकृती खूप गंभीर आहे. प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखणाऱ्या प्रशांत दामले वडिलांच्या हृदयाचे ठोके थांबलेत हे ओळखायला त्याला वेळ लागला नाही. त्याने स्पष्ट विचारलं, भाऊ आहेत की गेलेत. दुर्दैवी उत्तर मिळाल्यावर कॉन्ट्रॅक्टरची तीच गाडी घेऊन घरी पोहोचलेला मुलगा वडिलांना पंचतत्वात विलीन करून आईजवळ थोडा बसला.
गाडी घेऊन पुन्हा दौऱ्यावरती गेलेल्या नाटक कंपनीला मनावर दगड ठेवून सामील झाला. योगायोगाने चार दिवस प्रेमाचे या नाटकात शेवटच्या क्षणी त्यांना म्हाताऱ्या माणसाचा गेटअप होता. त्या रुपात पाहून सहकलाकार आणि प्रेक्षक म्हणाले की प्रशांत सेम तुझ्या बाबांसारखा दिसतोस. संकर्षणचे हे बोलणं होताच उपस्थितांना कंठ दाटून येतो, स्वतः प्रशांत दामले हे सुद्धा या क्षणी भावुक होतात. त्यानंतर संकर्षण त्याच्या खास शैलीत सुख म्हणजे नक्की काय असतं याची व्याख्या पटवून देतो. खरं तर प्रशांत दामले अभिनय क्षेत्रात येतील याची त्यांनासुद्धा कल्पना नव्हती. कारण लहानपणापासूनच त्यांना गाण्याची प्रचंड आवड होती. नाटकाच्या स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत सतीश पुळेकर यांच्याकडे ते बारकावे शिकत होते. त्याकाळातील मान्यवरांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले तसे ते घडत गेले.