माता रमाई खऱ्या आयुष्यात कशा धाडसी होत्या याच वृत्तीचा इतिहास चित्रपटातून दाखवण्यात यावा म्हणून अभिनेत्री प्रियांका उबाळे हिने मोठी मेहनत घेतली होती. मात्र हा चित्रपट बनवण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रियांका उबाळे हि मूळची परभणीची. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातून तिने आपले शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली. बाबो, प्रेमवारी, माझ्या नवऱ्याची बायको, साता जल्माच्या गाठी अशा मालिका तसेच चित्रपटातून तिला महत्वपूर्ण तसेच सहाय्यक भूमिका मिळत गेल्या. मात्र माता रमाईंचा प्रभाव बालमनावर रुजल्याने त्यांचा इतिहास जागतिक पातळीवर आणायचा या जिद्दीने तिला झपाटून सोडले होते.

मी रमाई या एकपात्री चित्रपटामुळे प्रियांका उबाळे प्रेक्षकांच्या मनात जागा करताना दिसली. लवकरच प्रियांका उबाळे विवाहबद्ध होत आहे. उद्या मंगळवारी ४ एप्रिल २०२३ रोजी प्रियांका प्रकाश वाघ यांच्यासोबत आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहे. परभणी येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या लग्नाचा ११७ वा वर्धापन दिन आहे. या दिवसाचे औचित्य साधून प्रियांका लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच प्रियांका आणि प्रकाश यांनी प्रिवेडिंग फोटोशूट करून घेतले. लग्नाचे आमंत्रण देताना प्रियांका म्हणते की, जय भिम नमो बुद्धाय सांगतांना खूप आनंद होत आहे. माझ्या प्रत्यक दुःखात पुढे आणि माझ्या प्रत्यक आनंदात पडद्याआड असलेला माझा अत्यंत जिवलग मित्र प्रकाश आता आयुष्यभराचा सोबती होणार आहे.

माता रमाई व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लग्नाच्या ११७ व्या वर्धापन दिनाचे अवचित्त्य साधून व त्यांच्या विचारांना स्मरून आमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करीत आहो. ४ एप्रिल रोजी आमचा साक्षगंध सोहळा आयोजित केला आहे.आपल्या सगळ्यांचे प्रेम व आशीर्वाद असुद्या. प्रियांका ज्याच्याशी विवाहबद्ध होत आहे तो प्रकाश वाघ तिचा खूप चांगला मित्र आहे. मी रमाई हा चित्रपट बनवण्याची संकल्पना तिने प्रकाशजवळ व्यक्त केली होती. तेव्हा प्रकाशने या चित्रपटाचे शूटिंग केले होते. हा चित्रपट बनवण्यासाठी प्रियांकाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र मित्रांच्या मदतीने तिने हे धाडस पेलण्याचे ठरवले. मी रमाई हा एकपात्री चित्रपट बनवण्यासाठी तिने माता रमाईंचा अभ्यास केला. विविध संग्रहातून माहिती मिळवली, स्क्रिप्ट लिहून काढले.
मात्र आता वेळ होती चित्रपटाला स्पॉन्सर कोण करणार याची. चित्रपट अनेक निर्मात्यांना आवडला मात्र पुरेसे पैसे नसल्याने किंवा यात प्रॉफिट नसल्याचे पाहून अनेकांकडून नकार मिळाला. मग स्वतःच चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि अभिनय करायचे ठरवले. बहिणीच्या मदतीने काही पैसे जमवले. फोटोग्राफर असलेला मित्र प्रकाश वाघला २०० डी कमेऱ्यावर चित्रपट शूट करण्यास सांगितले. चित्रपट पूर्ण झाला, मात्र तो दाखवायचा कुठे हा प्रश्न तिच्यासमोर होता. कारण त्यासाठी लागणारे पैसे तिच्याकडे नव्हते. शेवटी गावागावात जाऊन प्रोजेक्टरवर तिने चित्रपट मोफत दाखवण्याचे ठरवले. खेड्यापाड्यातील महिलांना रमाईचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्यामुळे प्रियांकावर कौतुकाचा वर्षाव झाला.