झी मराठी वाहिनीवर तू चाल पुढं या मालिकेत अश्विनीचा म्हणजेच एका गृहिणीचा रोजचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. एक सामान्य गृहिणी ते मिसेस इंडियाची सौदर्य स्पर्धा असा तिचा हा प्रवास मोठ्या अडचणींचा सामना करणारा ठरला आहे. आपल्या वयात आलेल्या मुलीची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आणि त्यात नवऱ्याचा विरोध पत्करून देखील ती आपले ध्येय्य साध्य करताना दिसत आहे. आता तर अश्विनीच्या या निर्णयाचा तिच्या नवऱ्याला त्रास होत आहे. त्यामुळे तो अश्विनीसमोर घटस्फोटाची कागदपत्र समोर ठेवतो. मात्र अश्विनी त्यावर सही करायला नकार देते. त्यात ननंदेच्या कटकारस्थानामुळे अश्विनी अनेकदा अडचणीतून सुखरूप बाहेर पडताना दिसली.
तू चाल पुढं ही मालिका त्याचमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. आता लवकरच मालिकेत तो क्षण येऊन ठेपला आहे ज्या क्षणाची अश्विनी इतके दिवस तयारी करत आहे. मिसेस इंडिया ही स्पर्धा लवकरच मालिकेत घडणार आहे. यावेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची मराठी मालिकासृष्टीत एन्ट्री होणार आहे. ही अभिनत्री आहे ईशा कोप्पीकर. ईशा या मालिकेत जजेसची भूमिका सकरण्यास सज्ज झाली आहे. नुकतेच मालिकेचे स्पर्धेच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. यावेळी ईशाला सेटवर रॅम्पवॉक करण्याचा मोह आवरला नाही. ईशा मालिकेत एन्ट्री घेणार असल्याने एपिसोड पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ईशा कोप्पीकर ही मराठी मुलगी आहे. काही दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर तिने बॉलिवूड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
फिजा, हॅलो डार्लिंग, कृष्णा कॉटेज, एक विवाह ऐसा भी, क्या कुल है हम, डॉन, कयामत, एल ओ सी कारगिल, डरना मना है अशा अमेक बॉलिवूड चित्रपटात ती कधी मुख्य नायिका, सहाय्यक तसेच विरोधी भूमिकेत पाहायला मिळाली. बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी ती एक होती. टिम्मी नारंग सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ती कालांतराने मराठी चित्रपटातही झळकली. मात या मराठी चित्रपटात ईशा प्रमुख भूमिकेत झळकली होती. फ्रेंडशिप अनलिमिटेड अर्थात एफ यु या मराठी चित्रपटात ती एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. या दोन चित्रपटानंतर इशाला मराठी मालिकेत झळकण्याची संधी मिळत आहे. तू चाल पुढं या मालिकेमुळे तिचे छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे.