झी मराठी वाहिनीचा चित्रगौरव पुरस्कार सोहळा येत्या रविवारी २६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होत आहे. या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी बॉलिवूड दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मीका मंदाना चंद्रा गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यंदाच्या सोहळ्यात विनोदसम्राट अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा सोनेरी क्षण प्रत्यक्षात अनुभवता यावा म्हणून झी मराठीचे प्रेक्षक रविवारची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वी लॅरेंजायटीस हा घशाचा आजार झाला होता. त्यामुळे अनेक सोहळ्यात जाण्याचे त्यांनी टाळले होते. झी मराठीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर केल्याने मामांनी आवर्जून सोहळ्याला हजेरी लावली आहे.
निवेदिता सराफ मात्र यावेळी अनुपस्थित राहिल्या, त्यांच्या सोबत त्यांचे धाकटे बंधू हजर राहिले होते. हा पुरस्कार देण्याआधी सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील एकंदरीत कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या गाण्यावर नृत्य सादर केले. अगदी अश्विनी ये ना गाण्यावर सिद्धार्थ अशोक सराफ यांना कॉपी करताना दिसला. गाणं संपताच सिद्धार्थ त्याच्या गळ्यातील फुलांचा हार घेऊन अशोक सराफ यांच्याजवळ येतो. त्यांना वाकून मानवंदना देतो त्यावेळी मात्र अशोक सराफ खूप भावुक होतात. हे पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी येतं. सुबोध भावे देखील अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देताना खूप भावुक होतो. अवघी मराठी सृष्टी ज्यांच्यामुळे ओळखली जाते आज त्यांना जीवनगौरव पुरस्कार देताना खूप छान वाटतंय अशा शब्दांत अशोक सराफ यांचे कौतुक करतो.
अशोक सराफ हा कौतुकाचा वर्षाव पाहून भरून पावलो अशी प्रतिक्रिया देतात. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून असं वाटतं की दरवेळेला आपण पुढचा जन्म नट म्हणूनच घ्यावा. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातला हा सोनेरी क्षण प्रत्येकाला भावुक करून जाणारा ठरला आहे. अशोक सराफ यांच्यामुळे मराठी सृष्टी ओळखली जाते हे सुबोध भावेचे वाक्य त्रिवार सत्य आहे. अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. भूमिका चांगली असेल तरच त्यांनी हिंदी सृष्टीत काम केलं आहे. गेल्या ५ दशकाहून अधिक काळ ते मराठी सृष्टीला सावरत आहेत. त्यामुळे त्यांचे हे योगदान बहुमोल आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्याकडे पाहून अनेक कलाकार घडत गेले हे सगळ्यांनीच मान्य केलं आहे.