ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन गेल्या काही वर्षांपासून आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बाबतीत अनेकदा लिहिण्यात आले होते. खरं तर विद्याताई पटवर्धन यांनी आपले संपुर्ण आयुष्य बाल रंगभूमीला आणि बालकलाकारांना घडवण्यात घालवले. बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षिका म्हणून काम करण्यासोबतच त्यांनी बाल नाट्यांचे दिग्दर्शन केले होते. यातूनच स्पृहा जोशी, प्रिया बापट यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांना त्यांनी घडवण्याचे काम केले. नाटकाचे दौरे असतील त्यावेळी आपल्या स्वखर्चातून मुलांना खाऊ आणत असत.
मुलांना मोठं करण्यामागे विद्याताई यांचा मोलाचा वाटा आहे. विद्याताईंनी अनेक चित्रपटातून, तसेच मालिका, नाटकातून अभिनय सुद्धा केलेला आहे. प्रेम करूया खुल्लम खुल्ला चित्रपटात त्यांनी साकारलेली अंबु विशेष लक्षवेधी ठरली होती. तर भाऊ कदमच्या नशीबवान चित्रपटातही त्यांना अभिनयाची संधी देण्यात आली होती. मात्र तब्येत बिघडल्यामुळे आणि दुर्धर आजारामुळे त्यांना चालता येणे कठीण झाले. अशातच त्यांना आजाराने ग्रासले असून त्या सध्या अंथरुणाला खिळून आहेत. विद्याताईंची ही परिस्थिती पाहून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र बालमोहन शाळेच्या शिक्षकांनी तसेच कलाकारांनी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला.
विद्याताईंची दिवसभर देखभाल करण्यासाठी एक महिला देखील रुजू करण्यात आली. मात्र उपचारावरील खर्च जास्त असल्याने आता विविध माध्यमातून मदतनिधी गोळा करण्यास सुरुवात केली जात आहे. हा मदतनिधी एका नाटकाच्या माध्यमातून गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलबत्या गलबत्या हे बालनाट्य खूप गाजलं, याच नाटकाचा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर येथे होणार आहे. १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता हे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाटकाच्या तिकीट विक्रीतून जेवढी रक्कम जमा होईल ती विद्याताईंच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. विद्याताई यांचे शिष्य या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. प्रेक्षकांनी नाटकाची जास्तीत जास्त तिकिटं खरेदी करावीत असेही त्यांनी आवाहन केले आहे.