मराठी चित्रपट अभिनेता सुशांत उर्फ सिद्धार्थ रे यांचा स्मृतिदिन नुकताच साजरा करण्यात आला. खूप कमी वयात सिद्धार्थ रे यांनी जगाचा निरोप घेतला होता. व्ही शांताराम यांचा नातू अशी सिद्धार्थची ओळख असली तरी चानी, जैत रे जैत, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी. वंश, बाजीगर या चित्रपटातून अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्धार्थने ओळख बनवली होती. बॉलिवूड, दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत प्रेमविवाह सिद्धार्थने केला. शांतीप्रिया यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटातून काम केले. सौगंध चित्रपटात ती अक्षय कुमारची नायिका बनली होती.
या चित्रपटानंतर सिद्धार्थ सोबत तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. व्ही शांताराम यांचा नातू अशी ओळख दिग्दर्शकाने करून दिल्यावर पहिल्याच भेटीत शांतीप्रियाला उंचपुरा डॅशिंग सिद्धार्थ आवडू लागला. मात्र फारशी ओळख नसल्याने हे प्रकरण इथपर्यंतच थांबले. एका चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार, सिद्धार्थ आणि शांतीप्रिया मंचावर आले. त्यावेळी शांतीप्रियाकडे पाहून सिध्दार्थने गाढव आहे अशी मराठीतून प्रतिक्रिया दिली. त्यावेळी अक्षय कुमार शांतीप्रियाची चांगलीच खेचू लागला. पण सिद्धार्थ मराठीतून असे काय बोलला हे तिला जाणून घ्यायचे होते. तेव्हा तिने सिध्दार्थचा फोन नंबर मिळवला आणि याचे स्पष्टीकरण विचारले. आपल्याला तो गाढव म्हणाला याचा शांतीप्रियाला राग आला होता. मात्र तिला तो आवडत असल्याने यातूनच दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या.
करिअर पुढे उज्वल असताना तिने लग्न करू नये अशी तिच्या आईची ईच्छा होती. मात्र सिध्दार्थने लग्नाची मागणी घातल्याचे पाहून आईने देखील होकार दिला. दरम्यान सिद्धार्थ आणि शांतीप्रिया यांचा सुखाने संसार सुरू होता. शुभम आणि शिष्या अशी दोन अपत्ये त्यांना झाली. शुभम पाचवी इयत्तेत गेला, शाळेचा त्याचा पहिलाच दिवस. दिवसभर आपले काम आटोपून रात्री साडे नऊच्या दरम्यान सगळे जेवायला बसले असतानाच सिध्दार्थला अचानक हृदय विकाराचा मोठा झटका आला. बसल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. सिध्दार्थच्या मृत्यू नंतर सिंगल मदर म्हणून आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी सांभाळली. शांतीप्रियाला मोठ्या भावाने लग्न न करता बहिणीच्या दोन्ही मुलांचे पालनपोषण स्वीकारले. आता तिची दोन्ही मुलं कला क्षेत्रात करिअरसाठी प्रयत्न करत आहेत.