चित्रपटात नायक नायिके इतक्याच सहाय्यक भूमिका देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. चित्रपटाच्या या भूमिकांमुळे कथानकाला खरा रंग चढलेला असतो. आज अशाच एका सहाय्यक भूमिकेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या अडखळत बोलण्याचा, व्यंगाचा चित्रपटात वापर कसा करायचा याची जाण मधू आपटे यांना होती. मधु आपटे यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात विनोदी भूमिका साकारल्या आहेत. तर जवळपास २० नाटकातून त्यांनी काम केलं आहे. आज १ मार्च रोजी मधुकर आपटे यांचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
१ मार्च १९१९ रोजी मधू आपटे यांचा कोल्हापूर येथे जन्म झाला. वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आई आपल्या तिन्ही मुलांना घेऊन भावाकडे राहायला आल्या. मुलांचे पालनपोषण व्हावे म्हणून लोणची, पापड विकायच्या. वयाच्या ९ व्या वर्षी मधु आपटे यांना भयंकर ताप आला, या तापातच त्यांची वाचा सुद्धा गेली. पुढे मिरजेच्या डॉ वानलेस यांच्याकडे घश्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा कुठे मधु आपटे यांना अडखळत का होईना बोलता येऊ लागले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मधु आपटे यांनी जेमतेम ५ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. अभ्यासात बऱ्यापैकी हुशार, सुंदर हस्ताक्षर असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नाही. पुढे मामाच्या ओळखीने त्यांना प्रभात फिल्म कंपनीत काम मिळाले.
शरीराने किरकोळ असणाऱ्या मधु आपटे यांना खूप कष्टाची कामं करायला लागायची. एकदा मधु आपटे यांचे अडखळत बोलणे पाहून फत्तेलाल यांनी १९३६ सालच्या संत तुकाराम चित्रपटात अभिनयाची संधी देऊ केली. मधू आपटे यांचा अभिनय केलेला हा पहिला चित्रपट ठरला होता. चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. यानंतर मधू आपटे यांना अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. १९४४ सालच्या भावबंधन या नाटकात त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काम मिळाले. विविध नाटकातून छोट्या छोट्या भूमिका साकारत असतानाच सुलोचना दिदींसोबत सेटवर जाण्याची संधी मिळाली. त्यांचा तिथला वावर पाहून हिंदी चित्रपट निर्माते त्यांना भूमिका देत असत. त्यामुळे मधु आपटे यांना हिंदी चित्रपट सृष्टीत देखील ओळख मिळू लागली.
मधू आपटे यांनी आपल्या अडखळत बोलण्याचा क्षमतेचा पुरेपूर वापर करत अनेक विनोदी भूमिका साकारल्या. हिंदी तसेच मराठी सिने जगतात दोनशे हुन अधिक चित्रपटात त्यांनी प्रभावी अभिनयाने गाजविल्या. देव माणूस, थांब लक्ष्मी कुंकू लावते, आम्ही जातो अमुच्या गावा, बंदिवान मी या संसारी, एकापेक्षा एक. अशी ही बनवाबनवी, कारगिर, अनपढ, चुनौती, एक सपेरा एक लुटेरा, अशा हिंदी मराठीतील जवळपास २०० चित्रपटातून मधु आपटे यांनी काम केले. १३ मार्च १९९३ रोजी मधू आपटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.