बॉलिवूड चित्रपट तसेच मालिका अभिनेता जावेद खान अमरोही यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. जावेद खान यांच्या जाण्याने सिने मालिका सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. जावेद खान अमरोही हे गेल्या वर्षभरापासून फुफ्फुसाचा आजाराने त्रस्त होते. त्यांना श्वास घ्यायला सुद्धा कठीण झाले होते. फुफ्फुस निकामी झाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावत होती, म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना सांताक्रूझ येथील सुर्या नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
जावेद खान अमरोही यांच्यावर ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नुक्कड या मालिकेमुळे जावेद यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेनंतर त्यांना मिर्जा गालिब मध्ये महत्वाची भूमिका मिळाली. दूरदर्शनवरील मालिकांमधून जावेद यांनी आपल्या आभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. अगदी छोट्या छोट्या पण तेवढ्याच महत्वपूर्ण भूमिकांमधुन ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. सत्यम शिवम सुंदरम, वो सात दिन, राम तेरी गंगा मैली, लगान, नखुदा, प्रेमरोग अशा जवळपास दीडशे चित्रपटातून त्यांनी मिळेल त्या भूमिका साकारल्या होत्या. अगदी भिकारी ते ऑफिसबॉय आणि विनोदी ते खलनायक अशा विविध ढंगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले.
मात्र गेल्या वर्षभरापासून फुफ्फुसाच्या आजारामुळे ते त्रस्त होते. अशातच आता त्यांच्या निधनाच्या बातमीने मालिका सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. खुनी मुर्दा, खुनी महल, कफन, कब्रस्तान, रात के अंधेरे में अशा हॉरर चित्रपटात त्यांना भूमिका ठरलेल्या असायच्या हे विशेष. विष्णूपुराण, बेताल पच्चीसी, शकुंतला अशा लोकप्रिय मालिकांमध्ये ते झळकले होते. सडक २ या चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते असे बोलले जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी झी टीव्ही वाहिनीसाठी सभासद म्हणून काम केले होते. आमिर खान, गोविंदा, शाहरुख खान अशा मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. हिंदी सिनेसृष्टीतील अशा या अष्टपैलू कलाकारास अखेरचा दंडवत.