मराठी हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या विनोदी कलाकारांपैकी हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेते धुमाळ होय. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी हिंदी मराठी चित्रपटातून ओळख बनवली होती. एक विनोदी अभिनेता, सहनायिकेचा वडील ते खलनायक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत साकारल्या होत्या. आज या हरहुन्नरी कलाकाराबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. धुमाळ यांचे पूर्ण नाव होते अनंत बळवंत धुमाळ. २९ मार्च १९१४ रोजी त्यांचा गुजराथ बडोदा येथे मराठी कुटुंबात जन्म झाला. वडील वकील असल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती.
मात्र धुमाळ १० वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. मग या चिमुरड्याच्या खांद्यावर लहान भावंडांची जबाबदारी येऊन पडली. सुरुवातीला आईसोबत रस्त्यावर जाऊन चहा आणि भजी विकण्याचा व्यवसाय केला. पुढे मोठे झाल्यावर नाटक कंपनीत त्यांना भांडी धुण्याची कामं मिळाली. याच दरम्यान नाटकाचे डायलॉग म्हणून दाखवणे त्यांना अगदी चोख जमायचे. यातूनच सेटवर कुठला कलाकार आला नसल्यास त्याच्या जागी अभिनयाची संधी मिळायची. अशाप्रकारे धुमाळ नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करु लागले. याच काळात त्यांची नाट्यविश्वातील मोठी नावं प्र .के. अत्रे आणि नानासाहेब फाटक यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या मदतीने मोठ्या भूमिका वाट्याला आल्या. अखेरीस धुमाळ चित्रपटांमध्ये विनोदी अभिनेता म्हणून तर कधी खलनायक म्हणूनही प्रसिद्धीस आले.
लग्नाची बेडी आणि घरा बाहेर यांसारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. मराठी चित्रपटानंतर धुमाळ यांनी आपली पाऊलं हिंदी सृष्टीकडे वळवली. तुमसे अच्छा कौन है, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर, चाचा चौधरी, बंबई का बाबू, कश्मिर की कली, गुमनाम अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. शुभा खोटे, मेहमूद आणि धुमाळ हे त्रिकुट अनेक चित्रपटात पाहायला मिळाले. धुमाळ हे चेंबूरला राहायला होते. त्यावेळी मुंबई ते चेंबूर हा प्रवास खूप कठीण असायचा. घरी फोन नसल्याने अनेक निर्मात्यांना त्यांच्याकडे जाता आले नाही. यामुळे अनेक चांगल्या भूमिकेला ते मुकले अशी खंत त्यांच्या मुलीने म्हणजेच हेमा फाटक यांनी सांगितली होती.
या क्षेत्रात मोठमोठ्या पार्ट्या होत असत, मात्र अशा पार्ट्यांमध्ये आमचे वडील आम्हाला कधीच घेऊन जायचे नाहीत. पार्टी मध्ये जाण्यासाठी तेवढा देखावा करावा लागत असे. जवळ पुरेसे पैसे आणि चांगले कपडे खरेदी करता येत नसल्याने त्यांनी या गोष्टी आवर्जून टाळल्या होत्या. असे हेमा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. धुमाळ यांचे १३ फेब्रुवारी १९८७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते, उद्या त्यांचा ३६ वा स्मृतिदिन आहे. अशा या हरहुन्नरी विनोदी कलाकारास मानाचा मुजरा.