गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सृष्टीत लग्नसोहळ्याला उधाण आलेलं आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची धामधूम सुरू असतानाच बॉलिवूड सृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने लग्नाची गाठ बांधलेली आहे. दृश्यम २ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि अभिनेत्री शिवालीका ओबेरॉय यांचा नुकताच राजेशाही थाटात लग्नसोहळा पार पडलेला आहे. लग्नाचे काही खास फोटो अभिषेकने शेअर केले आहेत, त्यावरून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिषेक आणि शिवाली यांनी ९ फेब्रुवारी रोजी गोव्यात हे लग्न केले.
राजेशाही थाटातील लग्नाला बॉलिवूड सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अजय देवगण, नुसरत भारुचा, कार्तिक आर्यन, इशिता राज, लव रंजन, भूषण कुमार यांनी हे लग्न अटेंड केलं होतं. अभिषेक आणि शिवालीका यांची ओळख एका चित्रपटातून झाली. शिवालीका अभिनित करत असलेल्या खुदा हाफिज या चित्रपटाची निर्मिती अभिषेकने केली होती. दोघांची सेटवर ओळख झाली आणि या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. दृश्यम २ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेकने समर्थपणे सांभाळली होती. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करताना दिसला. दृश्यम चित्रपटाच्या यशानंतर दृश्यम २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
खरं तर दृश्यम चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हे आव्हान अभिषेक पाठकने स्वीकारले. कथानकाची मांडणी आणि प्रेक्षकांची शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवत अभिषेकने हा चित्रपट दिग्दर्शित करून बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरवला. गेल्या दोन महिन्यांपासून दृश्यम २ चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसला आहे. तसेच सत्यघटनेवर आधारित दमण हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अभिषेकच्या पाठक याच्या यशाचा आनंद आता लग्नामुळे द्विगुणित झालेला आहे. एक नवीन सुरुवात असे म्हणत त्याने लग्नाचे काही खास फोटो शेअर करताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.