मराठी सेलिब्रिटींची लग्न, त्यांचे खाजगी आयुष्य हा नेहमी त्यांच्या चाहत्यांमध्ये कुतूहलाचा विषय ठरत असतो. गेल्या वर्षी मराठी सृष्टीतील अनेक लाडक्या कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली. त्यातील काही लग्न सोशल मीडियावर खूपच गाजली सुद्धा. अशातच १४ डिसेंबर २०२२ रोजी सुमित पुसावळे याने लग्नाची गाठ बांधलेली पाहायला मिळाली. त्याच्या लग्नाला लागीरं झालं जी, बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे सुमितच्या लग्नाचे काही खास क्षण या सेलिब्रिटींनी शेअर केलेले दिसले.
खरं तर सुमितने आपले लग्न ठरल्याची कुठलीही बातमी न देता साखरपुड्याचे फोटो अचानकपणे प्रसिद्ध केले होते. त्यावरून सुमित लग्न करतोय याची माहिती चाहत्यांना मिळाली होती. मात्र तो कोणासोबत लग्न करणार, याचीही उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र एका मुलाखतीत सुमितने आपले लग्न ठरल्याचा किस्सा नुकताच शेअर केलेला पहायला मिळतो आहे. सुमित आणि मोनिका यांचे अरेंज मॅरेज होते. सुमित एक अभिनेता आहे, त्यामुळे मोनिकाच्या घरच्यांना त्याच्या करिअर बाबत शंका होती. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असते. आता मालिकेतून प्रसिद्धी मिळत असली तरी पुढील आयुष्याची तरदूत करण्यासाठी सुमितकडे आणखी कुठले पर्याय आहेत, याचे त्याने स्पष्टीकरण दिले होते. सुमितने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले होते.
सुमितला स्वतःचे रेस्टॉरंट उभारायचे होते, मात्र अभिनयाची आवड त्याला या क्षेत्राकडे घेऊन आली. त्यामुळे मोनिकाच्या घरच्यांना त्याने याबाबत आश्वस्त केले होते. सुमितची पत्नी मोनिका ही आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. सतत कामात व्यस्त असल्याने तिला मनोरंजन क्षेत्रातले फारसे काही माहीत नव्हते. सुमित आणि मोनिका यांनी एका विवाहसंस्थेत नाव नोंदवले होते. यातून दोघांचे स्थळ सुचवण्यात आले होते. सुमितच्या घरच्यांनी सुमितचा फेटा घातलेला एक फोटो मुलीकडच्यांना पाठवला होता. त्यावेळी मोनिकाने तो फोटो पाहून असा फेटा घटलेला फोटो कोणी पाठवतं का? असा प्रश्न उपस्थित केला होता. बरं सुमित अभिनेता आहे हे सुद्धा मोनिकाला माहीत नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावरून त्याचा शोध सुरू झाला.
तर दुसरीकडे सुमितला मोनिकाचा फोटो पाहताक्षणी आवडला होता. लग्न करण्याबाबत त्याचं एक मत होतं की, अगोदर तो स्वतः मुलगी पाहणार आणि मग पसंत झाली तर घरच्यांनी पुढची बोलणी करायची. मोनिकाचा फोटो पाहिल्यानंतर त्याने तिच्या आईकडे मोनिकाचा मोबाईल नंबर मागितला. पुण्यात एका रेस्टॉरंट मध्ये त्यांची पहिली भेट झाली. दोन तास गप्पा मारत असताना सुमितला मोनिका आवडू लागली. याच भेटीत त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय पक्का केला. तर मोनिकाला सुद्धा सुमितचा स्वभाव आवडला होता. या भेटीनंतर दोघांच्या लग्नाची तारीख पक्की केली आणि १४ डिसेंबर रोजी मोठया थाटात लग्न पार पडले.