मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आले ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या येण्याने. या जोडगोळीने अनेक मराठी चित्रपट आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवले. त्यांना साथ मिळाली ती त्या वेळच्या दर्जेदार, हरहुन्नरी नायिकांची. या नायिकेमध्ये प्रेमा किरण यांचे सुद्धा नाव आवर्जून घ्यावे लागेल. सुटाबुटातल्या नायकाला ठसठशीत गावरान नायिका मिळाली ती प्रेमा किरण यांच्या रूपाने. दे दणादण, धुमधडाका अशा चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत प्रेमा किरण यांनी नायिका म्हणून काम केले. गेल्या वर्षी १ मे २०२२ रोजी प्रेमा किरण यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते.
प्रेमा किरण यांच्या निधनाने मराठी सृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. त्याअगोदर काही दिवसांपूर्वीच त्या झी मराठी वरील हे तर काहीच नायच्या मंचावर उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दे दणादण चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला होता. प्रेमा किरण या मृत्यू पश्चात देखील एका चित्रपटातून झळकताना दिसणार आहेत. देवा प्रोडक्शन प्रस्तुत रगील या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रणवराव राणे, शिवानी कठाळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोबतच दिवंगत अभिनेत्री प्रेमा किरण या चित्रपटाचा भाग असणार आहेत. प्रेमा किरण यांचा अभिनित केलेला हा अखेरचा चित्रपट ठरणार आहे. येत्या १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रगील चित्रपट प्रदर्शित होणार आहे .त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
प्रेमा किरण यांना बालपणापासूनच नृत्याची आवड होती. पुढे त्यांची ही आवड त्यांना अभिनय क्षेत्रात घेऊन आली. गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी, कपाळावर भले मोठे ठसठशीत कुंकू ही त्यांची चित्रपटातील ओळख आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. कुंकू झालं वैरी, सौभाग्यवती, माहेरचा आहेर अशा चित्रपटातून त्या झळकल्या होत्या. पोलीस वाल्या सायकल वाल्या हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आजही वरातीत वाजवलं जातं हे विशेष. या गाण्याची गंमत सांगताना त्या दोन तीन वेळेस पडल्या सुद्धा होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकलवर बसवून न्यायचे होते मात्र त्यांना ही सायकल चालवणे कठीण जात होते. अशातच प्रेमा किरण सायकल वरून तीन वेळा पडल्या होत्या. मी पडले म्हणून दे दणादण हिट झाला असे त्यांनी हे तर काहीच नायच्या मंचावर म्हटले होते.