रमेश मोरे दिग्दर्शित साथ सोबत हा चित्रपट आज १३ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात संग्राम समेळ, मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मोहन जोशी, अनिल गवस हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक दिग्गज कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत. या कलाकाराला जाणकार प्रेक्षकांनी लगेच ओळखलंही असेल. खरं तर त्यांची ओळख करून देणं म्हणजे त्यांना एका चौकटीत बांधल्यासारखं होईल. हे प्रतिभावंत कलाकार म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त होय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर साथ सोबत चित्रपटातून राजदत्तजी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे, एवढेच नव्हे तर अनेक कलाकारांना त्यांनी घडवलं सुद्धा आहे. हे चिंचेचे झाड, मधु इथे अन चंद्र तिथे, का रे दुरावा, प्रथम तुज पाहता, दिस जातील दिस येतील, दृष्ट लागण्या जोगे सारे, एकाच ह्या जन्मी जणू अशी अनेक अजरामर गीतं त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाला लाभली आहेत. २१ जानेवारी १९३२ रोजी विदर्भातील धामण गावात त्यांचा जन्म झाला. दत्तात्रय अंबादास मायाळू हे त्यांचं मूळ नाव. वडील आजोबा दोघेही रेल्वे खात्यात नोकरीला असल्याने धामणगावच्या रेल्वे स्टेशन जवळच त्यांचे घर होते. घरची आर्थिक परिस्थिती साधारण होती. वडिलांची सतत बदली, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. मात्र शालेय जीवनात निबंध लिहिण्याची आणि वाचनाची गोडी त्यांच्यात निर्माण झाली.
पुढे बीकॉमचे शिक्षण घेतल्यानंतर राजदत्त यांनी तरुण भारत दैनिक वृत्तपत्रामध्ये नोकरी केली. पण वर्षभरातच हे वृत्तपत्र बंद पडले. पुढे मद्रासला चांदोबाच्या संपादकिय विभागात त्यांनी नोकरी केली. कॉलेजमध्ये असताना नाटकातील भूमिकेसाठी राजा परांजपे यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. कॉलेजच्या शेवटच्या पेपरनंतर त्यांनी मित्रांसोबत ऊन पाऊस चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर राजा भाऊंचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. चांदोबासाठी नोकरी करत असताना राजा परांजपे यांच्या बाप बेटे या हिंदी चित्रपटाचे शूटिंग मद्रासला चालू होते. तेव्हा दिग्दर्शनाचे बारकावे शिकण्याची राजदत्त यांना संधी मिळाली. पुढे राजा परांजपे सोबत त्यांनी असिस्टंट म्हणून काम केले. मात्र पाठलाग चित्रपटावेळी राजा भाऊंच्या आई आजारी पडल्या.
अशातच त्यांनी पुढील काही भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजदत्त यांना देऊ केली. यातूनच मधुचंद्र हा पहिला चित्रपट त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शन म्हणून केला. हा चित्रपट चित्रपटगृहात अगदी दणक्यात चालला. अपराध, शापित, सर्जा, पुढचं पाऊल, अर्धांगी, अष्टविनायक, अरे संसार संसार. माझं घर माझा संसार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांबरोबर त्यांनी गोट्या मालिकेचे सुद्धा दिग्दर्शन केले. १३ चित्रपटांना राज्य शासनाचे पुरस्कार, ३ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, १ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार. ३ लोकप्रिय मालिकांना पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी राजदत्त यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक झाले. मराठी सृष्टीला लाभलेलं अनमोल रत्न म्हणून राजदत्त यांच्याकडे पाहिलं जातं. आज वयाच्या नव्वदीत सुद्धा त्यांच्या अभिनय क्षेत्रातला उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे.