मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला सदस्य म्हणजे किरण माने. किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात जाताच अपूर्वा नेमळेकर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. अनेकदा भांडणांमध्ये न पडता बाजूला राहून किरण माने यांनी अपूर्वावर निशाणा साधला होता. विकासला खुडूक कोंबडी पासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला होता. त्यामुळे किरण माने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत होते. यात त्यांना यश मिळाले देखील. म्हणूनच बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये त्यांनी टॉप तीन पर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली.
बिग बॉसच्या चौथ्या सिजनची ट्रॉफी आपल्याला मिळाली नाही तरी हरकत नाही, मात्र मी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवू शकलो हेच माझ्यासाठी पुरेसं आहे असे त्यांनी म्हटले आहे. बिग बॉसच्या घरात १०० दिवस राहिल्यानंतर किरण यांनी प्रथमच मीडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे सुद्धा केलेले आहेत. किरण माने यांना याअगोदर सुद्धा बिग बॉसने आमंत्रित केले होते. जेव्हा बिग बॉसचा दुसरा सिजन सुरू होता, तेव्हा या शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना बोलावले होते. पण त्यावेळी त्यांनी सफसेल नकार दिला होता. मात्र जेव्हा चौथ्या सिजनसाठी त्यांना पुन्हा आमंत्रण मिळाले, तेव्हा आपण हा शो करायचा हे त्यांनी पक्क केलं होतं. आज मी एका कॅमेऱ्यासाठी तरसतोय. त्या घरात चोवीस तास शंभर कॅमेरे माझ्या भोवती फिरणार होते.
माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या. किरण माने असा आहे, किरण माने तसा आहे. तर जे आहे ते दिसू दे एकदा लोकांना, पण ह्या अफवा नकोत. सगळ्या जगात असं झालं पाहिजे की किरण माने हा असाच आहे म्हणून मी हा शो स्वीकारला. मला सिद्ध करायला एक संधी मिळाल्यामुळे शेकडो कॅमेरे आता माझ्यासाठी लागतील. आत जाताना ही भावना माझ्या डोक्यात होती, म्हणूनच मी ह्या घरात जायचा निर्णय घेतला. मुलगी झाली हो मालिकेमुळे किरण माने यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. मालिकेतील कलाकारांसोबत गैरवर्तन केल्यामुळे तसेच सेटवर वाद घातल्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले होते, असे मालिकेच्या टीमकडून सांगितले जात होते.
मात्र एका राजकीय पोस्टमुळेच आपल्याला मालिकेतून काढले असल्याचा दावा त्यांनी केलेला होता. तेव्हा झालेल्या नुकसान भरपाईबद्दल आणि मानहानीबद्दल त्यांनी कायद्याचा आधार घेण्याचे ठरवले होते. तेव्हा मीडियाने सुद्धा ही बातमी कव्हर केलेली पाहायला मिळाली. यामुळे किरण माने यांची प्रतिमा मालिन झाली असे अनेकदा बोलण्यात येऊ लागले. मात्र मी कसा आहे हे एकदा लोकांसमोर यायला हवं, म्हणून त्यांनी बिग बॉसची ऑफर स्वीकारली होती. अर्थात बिग बॉसच्या ट्रॉफीपर्यंत ते पोहोचू शकले नसले तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र त्यांनी जागा बनवलेली पाहायला मिळत आहे. आणि याचे मला समाधान आहे असे किरण माने यांनी स्पष्ट केले आहे.