झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सौरभ आणि अनामिकाच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी स्वीकारलं आहे. या सोबतच मालिकेत राधा आणि निलची देखील प्रेम कहाणी जुळलेली पाहायला मिळते आहे. निलची भूमिका साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात सुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मालिकेतील निलचे लग्न होईल तेव्हा होईल, मात्र इकडे या निलने साखरपुडा करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे. निलची भूमिका स्वानंद केतकर याने साकारलेली आहे. काल ४ जानेवारी २०२३ रोजी स्वानंदचा त्याची खास मैत्रीण अक्षता सोबत साखरपुडा संपन्न झाला आहे.
स्वानंद आणि अक्षतावर आता सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वानंदची होणारी पत्नी अक्षता ही देखील कलाकार आहे. स्वानंद केतकर हा मूळचा मुंबईचा, रामणारायन रुईया कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक राज्यनाट्य स्पर्धा तसेच एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. नाट्य स्पर्धांमधून त्याने उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसं देखील मिळवली होती. स्वानंदने कलाश्रय संस्थेची स्थापना केली यातून गायन स्पर्धा, म्युजिक वर्कशॉप, वारली आर्ट वर्कशॉप सारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आपली सोसल वाहिनी या सेगमेंटमधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले आहे. यातील काही व्हिडिओत स्वानंद केतकर देखील झळकला होता.
अभिनयाची उत्तम जाण असलेल्या स्वानंदला तू तेव्हा तशी मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली आणि निलच्या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. नीलच्या भूमिकेने स्वानंद प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. स्वानंदने जीच्यासोबत साखरपुडा केला आहे ती अक्षता त्याची खूप जवळची मैत्रीण आहे, दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. त्यामुळे मागील सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखतात. अक्षतासुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे, कलादिंडी या नाटिकेत ती रखुमाईच्या भूमिकेत झळकली होती. या दोघांनी मिळून कलाश्रय संस्थेची स्थापना केली आहे. दोघेही नाटकवेडे असल्याने त्यांचे खऱ्या आयुष्यात सुद्धा सूर जुळून आले. गेल्या सात वर्षांच्या त्यांच्या मैत्रीचे आता नात्यात रूपांतर होत आहे. या दोघांनाही आयुष्याच्या या नव्या प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा.