स्टार प्रवाहवरील शोध अस्तित्वाचा या मालिकेत पल्लवी आणि शांतनूची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मोठया आईच्या कटकारस्थानापासून ती सूर्यवंशी कुटुंबाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र आता विनायकच्या रूपाने आणखी एक अडथळा त्यांच्या संसारात लुडबुड करत आहे. मालिकेत मोठ्या आईचा मुलगा म्हणजेच विनायक सूर्यवंशी या पात्राची एन्ट्री झाली आहे. या पात्राची मालिकेत एन्ट्री होताच ती पल्लवीच्या जीवावर बेतलेली पाहायला मिळाली होती. विनायक हा मेघनाचा नवरा आहे हे पल्लवीला माहीत नसते. पल्लवीचा अपघात घडवून आणायचा म्हणून रस्त्यावरून जाताना तो तिला धक्का देतो.
समोरून भरधाव येणारा ट्रक पाहून रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती तिला अपघातातून वाचवते. मात्र हाच मोठ्या आईचा मुलगा आहे हे तिला नंतर समजते. विनायक आणखी कोणकोणती खेळी खेळणार आणि पल्लवी कशी मात देणार हे पाहणे रंजक होणार आहे. विनायक सूर्यवंशीची भूमिका अभिनेता अंबरीश देशपांडे साकारत आहे. अंबरीश हा मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेता आहे. तू सौभाग्यवती हो मालिकेत त्याने रंगरावचे पात्र गाजवले होते. नारबाची वाडी, बेरीज वजाबाकी, दगडी चाळ २, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तप्तपदी या चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. अंबरीश देशपांडे हा पुण्याचा, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना पुरुषोत्तम करंडक, अल्फा करंडक सारख्या राज्यनाट्य स्पर्धांमधून सहभाग घेतला होता.
अंबरीशच्या उत्कृष्ट अभिनयाला पारितोषिक देखील मिळाले होते. तळेगाव येथील कलापीनी या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला. इथे खुर्च्या उचलण्यापासून ते संगीत संयोजन, प्रकाश योजना, वेशभूषा अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत अभिनय क्षेत्रात दाखल झाला. अलबत्या गलबत्या या बालनाट्यातून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. तू सौभाग्यवती हो मालिकेतील रंगरावच्या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेत अशीच एक विरोधी भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे. विनायक आता सूर्यवंशी कुटुंबात दाखल होऊन आपला हिस्सा मागत आहे. मात्र पल्लवी त्याला कशी वठणीवर आणते हे पाहणे अधिक रंजक होणार आहे. या नवीन भूमिकेसाठी अंबरीश देशपांडेला खूप खूप शुभेच्छा.