मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमधली सदस्य मीरा जगन्नाथ हिने आपल्या स्वकमाईतून पहिली वहिली चारचाकी गाडी खरेदी केली आहे. बुधवारी दत्त जयंतीच्या निमित्ताने मिराने ही कार खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ह्युंदाई कंपनीची गाडी घेतली, जिची मार्केट प्राईस ७ ते ९ लाख आहे. मिराने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत ओळख बनवली आहे. आपल्या यशाचा वाटा तिच्या आईवडिलांना तसेच चाहत्यांना देऊ इच्छिते. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असताना मिराला मराठी मालिकांमधून लहान मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने छोटेसे पात्र साकारले होते. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे. मालिकेत मिराने मोमोचे पात्र साकारले होते, जे मालिकेच्या नायकाला मिसमॅच होते. अगदी भडक रंगाची लिपस्टिक आणि गेटअप पाहून मालिकेतून तिला प्रेक्षकांनी ट्रोलही केले होते. पण याच भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आणि बिग बॉसच्या घरात तिने एन्ट्री मिळवली. इथे मिराचे अनेकांशी वाद झाले, महत्वाचं म्हणजे विशालसोबत तिचा नेहमीच वाद झालेला दिसला. बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये या दोघांनाही आमंत्रित केले, तेव्हा दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. बिग बॉसच्या घरात हे एक आठवडाभर चॅलेंजर्स म्हणून वावरत होते.

मिराने प्रेक्षकांचे यावेळी चांगले मनोरंजन केले. या दोघांसोबत आलेले राखी सावंत आणि आरोह वेलणकर अजूनही बिग बॉसच्या घरात आहेत. मात्र ह्या आठवड्यात त्यांची एक्झिट होईल असे बोलले जात आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच मिराला एक नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. ठरलं तर मग या स्टार प्रवाहच्या मालिकेत ती विरोधी पात्र साकारताना दिसणार आहे. मालिकेतली साक्षी ही कटकारस्थान करण्यात पटाईत दाखवली आहे. या भूमिकेसाठी मिराची निवड करण्यात आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यशाचा एकेक टप्पा सर करत असताना तिने पहिली गाडी खरेदी करत आपला आनंद सगळ्यांसोबत शेअर केला आहे. मराठी सेलिब्रिटींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.