रितेश देशमुख याने हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने साकारलेल्या विनोदी भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं. तर कधी एक व्हिलन चित्रपटातून तो खलनायक बनूनही प्रेक्षकांसमोर दाखल झाला. लई भारी हा त्याचा मराठी सृष्टीतला पदार्पणातील पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसला. वेड या त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली कारण या चित्रपटातून तो दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निखळ प्रेमावर आधारित वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात रितेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर पत्नी जेनेलिया देशमुख प्रमुख नायिकेची भूमिका साकारणार आहे. जेनेलिया देशमुख हिने लई भारी चित्रपटातून एका गाण्यासाठी काम केले होते. आता वेड चित्रपटाच्या माध्यमातून ती मराठी सृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट दोघांसाठीही तेवढाच खास ठरला आहे. आज दुपारी १२ वाजता चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात येईल अशी पूर्वकल्पना रितेशने अगोदरच दिली होती. त्यामुळे वेडची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली आहे. रितेश देशमुख एका प्रेमीच्या भूमिकेत आहे आणि आपल्या प्रेयसीला शोधण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. प्रेम, प्रेम असतं; समुद्रासारखं कुणाच्या नशिबी दाट, कुणाच्या नशिबी गाठ.
असं म्हणत वेड्यासारखं प्रेम करणारा हा सत्या आपले ध्येय साधण्यासाठी काय काय संघर्ष करतो. याची कथा वेड मधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टिझर पाहून या चित्रपटाची तुलना साऊथच्या चित्रपटासोबत करण्यात येत आहे. नागाचैतन्य आणि समंथा रूथ प्रभू यांची प्रमुख भूमिका असलेला मजीली हा चित्रपट याच धाटणीचा असावा असे म्हटले जात आहे. साऊथचा टच असलेला वेड चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा नक्कीच ठरला आहे. मराठी सृष्टीला अशा नायकाची आणि कथानकाची गरज होती हे वेडचा टिझर पाहून प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चित्रपटाच्या टिझरला अवघ्या काही वेळातच लाखोंचे व्ह्यूजस मिळाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणार हे निश्चित झाले आहे.