महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून सुत्रसंचालीका म्हणून प्राजक्ता माळी हीने मोठी लोकप्रियता मिळवली. तिच्या निखळ हास्याचे अनेक चाहते आहेत. त्याचमुळे दिवसेंदिवस तिच्या फॅनफॉलोअर्सच्या संख्येत वाढ होताना दिसते. नुकतेच प्राजक्ताच्या घरी एका खास पाहुणीचे आगमन झाले आहे. ही पाहुणी म्हणजे प्राजक्ताची भाऊजय. माळी कुटुंब काही दिवसांपासून नव्या नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. प्राजक्ताला सख्खा भाऊ नाही एक बहिण, भाऊजी, दोन भाच्या आणि आईवडील असं तिचं छोटंसं कुटुंब आहे. मात्र आपल्या चुलत भावाच्या लग्नात ती अगदी हक्काने नटूनथटून लग्नसोहळा साजरा करताना दिसत आहे.
सगळे पाहुणे मंडळी एकत्र जमल्यामुळे हा गोतावळा पाहून ती भलतीच खुश झालेली आहे. भावाच्या लग्नामुळे नवीन पाहुण्याचं म्हणजेच भावजयचे आगमन झाले आहे, त्यामुळे माळी कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडली आहे. भावाच्या लग्नात प्राजक्ताला नऊवारी साडी नेसायची होती. मात्र ही साडी शोधण्यासाठी आणि त्यावरचे दागिने शोधण्यासाठी तिने जंग जंग पछाडलं होतं. अस्सल नऊवारी साडी आणि थेट कोल्हापूरमधून दागिने आणल्याने तेव्हा कुठे हवा तसा लूक साधता आला. नटून आत्मा सुखावला असे ती लग्नातले फोटो शेअर करताना म्हणते. या लग्नात आजोबा, आई वडील, बहीण आणि दोन भाच्या सोबत एकत्र फोटो काढताना चार पिढ्या एकत्र येऊन माळी कुटुंबियांने हा लग्नसोहळा साजरा केला असे प्राजक्ता कॅप्शनमध्ये म्हणते.
गेल्या काही वर्षांपासून एकामागून एक येणाऱ्या प्रोजेक्टमुळे प्राजक्ता माळी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. रानबाजार वेबसिरीज असो किंवा वाय चित्रपट अशा प्रोजेक्टमधून ती नेहमी वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसली आहे. प्राजक्ताची अभिनय क्षेत्रात एन्ट्री झाली ती तांदळा एक मुखवटा या चित्रपटातून. त्यानंतर झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. चित्रपट, मालिका अशा माध्यमातून ती नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. अभिनयाची आवडीसोबतच तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत. वा दादा वा हा तिचा डायलॉग तर खूपच लोकप्रिय झाला आहे. प्राजक्ता वेगवेगळ्या भूमिकेच्या शोधात असते त्यामुळे अशा भूमिका मला मिळत राहोत अशी ती नेहमीच प्रार्थना करते.