संकर्षण कऱ्हाडेच्या सहजसुंदर अभिनयाचं कौतुक सर्वच प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसलं आहे. रिऍलिटी शोमधील त्याचा हजरजबाबीपणा तर तेवढाच भाव खाऊन जाताना पाहायला मिळतो. त्याचमुळे गेल्या काही वर्षांपासून तो मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकताच नाटक निमित्त त्याचा कोकण दौरा सुरू झाला. हा दौरा सुरू होण्याअगोदर संकर्षणची धावपळ पाहून त्याच्या बाबांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. या व्यस्त शेड्युल मधून बाप्पा मला नक्कीच सांभाळून घेईल. अशा अर्थाने तो त्याच्या बाबांना काळजी करू नका, गणपती मला स्वतः घ्यायला येईल असे बोलून गेला.
संकर्षणची ही ईच्छा मात्र स्वतः बाप्पानेच पूर्ण करून घेतली, याची प्रचिती त्याला नुकतीच अनुभवायला मिळाली आहे. संकर्षण म्हणतो की, मी परवा मुंबईहुन नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघतांना घरात सहज म्हणालो. रत्नागीरीहून अडीच तासावर गणपतीपुळे आहे; दर्शनाला जाउन येइन. तेव्हा बाबा काळजीने म्हणाले की, का धावपळ करतोस? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर, त्यात तू जाणार कसा? प्रवासाचं काय? मी अगदी सहज थाटात म्हणालो कि, बाबा काळजी करु नका. मला गणपती स्वत: घ्यायला येईल आणि घरुन निघालो. काल रात्री रत्नागीरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थानचे पुजारी श्री उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेउन आले. मला म्हणाले चला दर्शनाला गाडी घेउनच आलोय.
मी म्हणालो पण माझं काही तशी तयारी नाहीये. शिवाय राहायची सोय चिपळूनला आहे. ते म्हणाले रहायची, दर्शनाची, जेवणाची सगळी सोय करतो. तुम्ही फक्तं गाडीत बसा आणि चला. मला माझंच स्वत:चं वाक्यं आठवलं. मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो, राहाण्याची उत्तम सोय केली. आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं, दर्शनाला घेउन गेले. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला आणि मनसोक्तं खायला घातलं. मी तुम्हाला कसा सांगु ह्या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि, हे सगळं गणपती त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय. माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये की, बोलतांना कायम चांगलं बोलावं. मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पा ने माझ्यासाठी काय काय केलं. मी खूप भारावून गेलोय, बाप्पा मोरया.