मराठी सेलिब्रिटी विश्वात कुठे लग्न सोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळत आहे. तर कोणाच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन होत आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री ऋचा हसबनिस हिला काल पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. तिच्या या बातमीने सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. मराठी मालिकेतून यश मिळवल्यानंतर अनेक नायिका हिंदी मालिकेकडे वळतात. यात बहुतेक अभिनेत्रींना यश मिळते आणि तिथे त्या स्थिरस्थावर होऊन आपले नाव कमावतात. असाच काहीसा अनुभव ऋचा हसबनिस हिने देखील घेतला आहे. ऋचा हसबनिस ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे.
ऋचाने चार चौघी या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. २००९ साली स्टार प्रवाह वाहिनीवर चार चौघी ही मालिका प्रसारित होत होती; या मालिकेत देविकाचे पात्र साकारले होते. मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ऋचाने पुढे हिंदी मालिका सृष्टीत आपले नशीब आजमावले. तुज संग प्रीत लगाई सजना नंतर साथ निभाना साथीया मालिकेतून तिला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तिने साकारलेली राशी मोदी ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली. मध्यंतरी यशराज मुखाते या नव्या दमाच्या संगीतकाराने रसोडे में कौन था? हे गाणं तयार केले होतं. या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. हा डायलॉग याच मालिकेतला असल्याने या गाण्यावरून यशराज मुखातेला टॅग करून वो मै थी अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.
साथ निभाना साथीया ही मालिका जवळपास ४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. या मालिकेनंतर ऋचा काही काळ छोट्या पडद्यावर दिसली. मात्र २०१५ साली रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या राहुल जगदाळे सोबत तिने लग्नगाठ बांधली. त्यानंतर ऋचा अभिनयापासून थोडीशी दुरावली. त्यानंतर नच बलीये, बॉक्स क्रिकेट लीग यामध्ये ऋचा सक्रिय होती. २०१९ साली तिने पहिल्या अपत्याला जन्म दिला. तिची मुलगी रुही आता ३ वर्षांची आहे. गेल्या वर्षी मालिकेत येण्याची ईच्छा तिने व्यक्त केली होती; मात्र चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याचे तिने त्यावेळी म्हटले होते. ऋचा दुसऱ्यांदा आई होणार हे तिने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. बिग सिस्टर असे म्हणत तिने आपल्या लेकीचा एक फोटो शेअर केला होता. त्यावरून तिने दुसऱ्यांदा आई बनणार असल्याची हिंट दिली होती.