बिग बॉसच्या घरातून योगेश जाधवने एक्झिट घेतली. त्याच्या जाण्याने यशश्री, तेजश्री आणि अमृता धोंगडे भावुक होऊन रडू लागल्या. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून योगेश सर्व खेळ त्याच्या ताकदीने खेळत होता. मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव त्याला घेता न आल्याने त्याला या घरातून काही दिवसातच बाहेर पडावे लागले. योगेश जाधव हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा. योगेश जेव्हा दीड वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बाबांनी त्याच्या आईला आणि योगेशला सोडून दिले होते. तेव्हा पासूनच योगेश आणि त्याच्या आईचा सांभाळ त्याच्या मामाने केला होता. आपल्या आयुष्यातला खडतर प्रवास अनुभवणाऱ्या योगेशने याबद्दल खुलासा केला.

आपल्या कष्टाचे श्रेय मामा आणि आईला द्यायला विसरत नाही. शरीराने उंच पुरा असल्याने योगेशने डब्लुडब्ल्यूइ मध्ये जावे असे त्याच्या मामाचे स्वप्न होते. खरं तर योगेशच्या कुटुंबातील सर्वचजण उंच आहेत. वडील आणि मामांकडेही सगळे उंच असल्याने प्रत्येकजण खेळ आणि कुस्ती क्षेत्राशी निगडित आहेत. एवढेच नव्हे तर योगेशच्या कुटुंबातील महिला देखील खेळामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच बालपणापासूनच त्याची खेळातली गोडी वाढत गेली. मात्र दहा वर्षांपूर्वी मामाच्या निधनानंतर त्यांचा सहवास संपला आणि मग योगेशने घर सोडून पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यावर बॉक्सिंग प्रशिक्षक कडून त्याला मोठा सपोर्ट मिळाला. या प्रवासात त्याला आईची देखील मोलाची साथ मिळत गेली.

मामानंतर जर कोणाची साथ मिळाली असेल, तर ती कोचची असे योगेश आवर्जून म्हणतो. तुला ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात तू काम कर पण नाव खराब करू नकोस असे त्याची आई त्याला नेहमी सांगते. २०१५ साली योगेशचा मोठा एक्सिडेंट झाला होता. यात त्याच्या चेहऱ्यावर ५४ टाके पडले होते. अपघातामाऊले योगेशचे ऑपरेशन करायचे आहे; हे त्याच्या आईला कळून द्यायचे नव्हते म्हणून मग परवानगीसाठी मामाच्या मुलाने सही केली होती. योगेशला शुद्ध आली त्यावेळी त्याने डॉक्टरांना मी बॉक्सिंग करू शकतो ना? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर योगेशचा जबडा जवळपास दीड वर्षे सुजत होता. म्हणून मग त्याने पूर्णवेळ बॉक्सिंग करण्यापासून स्वतःला लांब ठेवले होते.
या प्रवासात बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले. आणि यामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली असे तो म्हणतो. योगेशला चित्रपटात देखील झळकण्याची संधी मिळाली आहे. हर हर महादेव या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. तर काही जाहिरातीमध्येही तो काम करताना दिसला आहे. बॉक्सिंग हे योगेशचं स्वप्न आहे; या क्षेत्रात त्याला आपलं करिअर करायचं आहे त्यासाठी तो मोठी मेहनत घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरामुळे योगेश प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या प्रसिद्धीचा देखील त्याला फायदा होईल. या घराने मला खूप प्रेम दिलं, हे मी कधीही विसरणार नाही असे तो आवर्जून म्हणताना दिसतो.