मराठी सिनेमाच्या पडद्यावर विनोदी पटांचा काळ गाजवणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज लक्ष्या या जगात नसला तरी त्याच्या विनोदाचं टाइमिंग, सिनेमे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विनोदाने रसिकांना दिलेला आनंद आजही कायम आहे. आज त्याच्या जयंती निमित्ताने अनेक कलाकार लक्ष्या विषयीच्या आठवणी शेअर करत आहेत. अभिनेता भरत जाधव याने ही लक्ष्याची अशीच एक आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे. रत्नागिरीमध्ये २६ ऑक्टोबर १९५४ साली जन्मलेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ रोजी अखेरचा श्वास घेतला.
सिनेरसिकांच्या आठवणीत त्यांचा लाडका ‘लक्ष्या’ नेहमीच राहील. पण त्यांच्यासोबत प्रत्यक्षात काम केलेल्यांच्या आठवणीही लाखमोलाच्या आहेत. अभिनेता भरत जाधवनेही तेच स्टारडम मिळवले, जे लक्ष्याने मिळवले होते. दोघांचेही कॉमिक टायमिंग, हसरा चेहरा, विनोदी भूमिकांमध्ये सहज वावरण्याची कला प्रेक्षकांना भावली. त्यामुळे दोघांनी एकत्र केलेला सिनेमा ‘पछाडलेला’ ही विशेष गाजला. कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते की हा सिनेमा लक्ष्मीकांत याचा शेवटचा सिनेमा असेल. लक्ष्मीकांत यांनी फोन करुन सांगितल्यानंतर भरतने ‘पछाडलेला’ मध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्याची आठवण भरतने शेअर केली आहे. भरतने म्हटले आहे की, लक्ष्या मामा! खूप आठवणी आहेत.
आम्हा नवोदितांना त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केलं, आधार दिला. त्यांनी आपल स्टारपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणुन हाक मारू शकायचो. खूप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्याबद्दल सांगायची सगळ्यात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट. ‘सही रे सही’ जोरात सुरू होतं. अशातच जानेवारी २००३ ला महेश कोठारे सरांनी पछाडलेलासाठी विचारलं. आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत सही चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते; त्यामूळे मी त्यांना नकार कळवला. भरत पुढे म्हणतो की, मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला.
तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे. महेशला पटकन जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो पिक्चर सोडू नकोस. मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि तिथून लक्ष्या मामांना कळवलं की मी पछाडलेला करतोय. सांगायचा मुद्दा हा की; इतका मोठा माणूस, कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. पछाडलेला ला मी त्यांचा आशीर्वाद मानतो. विनम्र अभिवादन! भरत जाधवने हा सिनेमा केल्यानंतर प्रेक्षकांनी तो अक्षरश: डोक्यावर उचलून धरला. मालिका रंगभुमी गाजवणारा भरत त्यानंतर सिनेमाही गाजवू लागला. आजही या सिनेमातील संवाद, गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.