प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. मग ती स्त्री बहीण, आई, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते. चला हवा येऊ द्या या शोमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या कुशल बद्रिकेने देखील आपल्या यशाचा वाटा कायम पत्नी सूनयनाला दिला. सूनयना आणि कुशल यांचा प्रेमविवाह आहे. स्ट्रगलच्या काळात तू तूझ्या आवडत्या क्षेत्रात काम कर मी घर सांभाळेल. असा ठाम विश्वास देणाऱ्या सूनयनासाठी कुशल नेहमीच भरभरून बोलताना, लिहिताना दिसला आहे. सूनयनाला नृत्याची विशेष आवड होती. ती भरतनाट्यमचे धडे देखील गिरवत होती. नोकरी, घर, संसार सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागली होती.
या प्रसंगातूनही तिने वेळ काढून नृत्याचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली. चला हवा येऊ द्या या शोमुळे कुशल बद्रिके आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाला. यशाचा अनुभव घेत असताना सूनयानाची राहून गेलेली ईच्छा त्याने पूर्ण करण्यास पाठिंबा दिला. दिल्लीतील एका मोठ्या व्यासपीठावर सूनयनाला नृत्याचे सादरीकरण करायचे होते. ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ असे त्यावेळी म्हणत त्याने तिच्या पंखांना मोकळी वाट करून दिली होती. आयुष्यात अनेक चढउतार सहन करणाऱ्या आपल्या पत्नीला मुघल ए आझम मध्ये परफॉर्मन्स सादर करताना पाहून कुशल खूपच भावुक झाला. त्याने सूनयनासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली.
कुशल म्हणतो की, यार सुनयना; लग्नानंतर तू नोकरी करायचा निर्णय घेतलास. मी अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करायला मोकळा झालो. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या “तू” एक हाती सांभाळल्यास. घराचे हप्ते, संसाराचा राडा, गंधारचं बालपण सगळं सगळं तू बघितलस. मी कुठेच नव्हतो ह्या सगळ्यात! आणि त्यानंतर कधीतरी “तू” स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलंस “कथ्थक शिकायचं, आणि परफॉर्म करायचं”. आज तुला मुघल ए आजमच्या शोमध्ये पाहिलं आणि काय भारी वाटलं यार मला. ते रात्री अपरात्री तू “क्रांधा तिकधा तुन्ना, तिकीड तिकीड धुम.” वगैरे बडबड करायचीच बघ. सारखं ते बोटांवर काहीतरी; “एक दोन, एक दोन तीन, एक दोन तीन चार.”
असं काहीतरी बडबड करत राहायचीस रात्ररात्रभर, ते आठवलं. किती मस्त नाचतेस ग “तू“ आणि किती मोठ्या जागी परफॉर्म करतेस यार. खरंच तुझा अभिमान वाटतो मला. “तुझ्या नावापुढे, माझं एक नाव जन्म मृत्यू पल्याड, प्रेम नावाचं गाव.” आणि हो,मुघल ए आझम एक जिवंत सिनेमा, एक दैदिप्यमान अनुभव. प्रियांका बर्वे तुझ्या विषयी सविस्तर लिहीनच पण तू कमाल आहेस. अनारकली म्हणून तू सलीमचच काय आम्हा सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकलीस, तुला खूप प्रेम.