अभिनय क्षेत्र आणि त्याच्या जोडीला व्यवसाय असे समीकरण आता मराठी सृष्टीला फारसं नवीन नाही. कारण सर्रासपणे अभिनेते आणि अभिनेत्री जोडव्यावसाय म्हणून हॉटेल तसेच कपड्यांच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. नुकतेच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने देखील अशाच एका व्यवसायात उडी घेण्याचे ठरवले. अर्थात हा व्यवसाय उभारण्यासाठी तिला काही वर्षांची मेहनत देखील घ्यावी लागली हे वेगळे सांगायला नको. मृण्मयी तिचा नवरा स्वप्नील राव आणि गौतमी या तिघांनी मिळून साबणाचा व्यवसाय करण्याचे ठरवले. साबण संपूर्णपणे नैसर्गिक असावा असा त्यांचा अट्टाहास होता.
स्वतःचे फार्महाऊस उभारून त्यांनी आपल्या शेतातच तयार होणाऱ्या कच्च्या मालाचा वापर करण्याचे ठरवले. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून जीवतोड मेहनत देखील घेतली. आता त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. मृण्मयीचा नवरा स्वप्नील राव हा एमबीए आहे; वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वरिष्ठ पदावर काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो एका वेगळ्या व्यवसायाच्या शोधात होता. मृण्मयीच्या साथीने त्याने नैसर्गिक शेतीकडे आपले लक्ष्य वळवले. यातूनच साबणाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. हे साबण साधेसुधे साबण नसून अगदी पर्यावरणापूरक नैसर्गिक पद्धतीने स्थानिक लोकांद्वारे बनवण्यावर त्यांनी भर दिला. निल आणि मोमो असे हटके नाव व्यवसायाला दिले आहे.
याबद्दल मृण्मयी म्हणते की, “स्वप्नील राव नील आणि मृण्मयी देशपांडे राव मोमो यांनी कंपनीची स्थापना केल्यापासून खूप लांब पल्ला गाठला आहे. आम्ही मुंबई सोडली आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाबळेश्वरमधील परमॅकल्चर होमस्टेडमध्ये स्थायिक झालो. कार्बन पॉझिटिव्ह, शून्य कचरा जीवन जगण्याचा निर्धार करून, दैनंदिन जीवनात छोटे बदल करण्यास सुरुवात केली. आम्ही शंभर टक्के सेंद्रिय शेतमालापासून बनवलेले घरगुती साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि डिओडोरंट्स वापरण्यास सुरुवात केली.” सेंद्रिय पद्धतीने बनवण्यात आल्याने त्वचेला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यासाठी कोणत्याही प्राण्यांच्या चाचणीची देखील आवश्यकता नाही असे त्यांनी ठाम मत मांडले आहे.
नील अँड मोमो साबणाच्या वेगवेगळ्या व्हरायटी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळतील. महाबळेश्वर येथे निसर्गाच्या सानिध्यात मृण्मयीने आपलं टुमदार फार्महाऊस उभारलं आहे. फार्महाऊसचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला दोन वर्षे वाट पाहावी लागली आहे. ‘ स्वप्न प्रगतीपथावर आहे! जगायला काय लागतं? १० बाय २० ची आनंदी जागा आणि ज्याच्या बरोबर स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याचा हात. दोन वर्षांपासून झगडतो आहोत; आता मिटल्या डोळ्यांमागचं स्वप्न डोळ्यासमोर दिसत आहे. अजून खूप मजल मारायची आहे. पण, एका वेळी एकच पाऊल’. असे म्हणत तिने काही खास फोटो टाकले आहेत. तिचं हे टुमदार फार्म हाऊस पाहून; तिची पुढची स्वप्नं देखील पूर्णत्वास येवोत अशा चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.