मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर मोठ्या थाटात पार पडला होता. त्यावेळी शिव ठाकरेने त्याच्या खास अंदाजात एन्ट्री करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली. मराठी बिग बॉसचा विजेता म्हणून शिव ठाकरेकडे एक तगडा सदस्य म्हणून पाहिले जाते. आणि त्याचमुळे की काय तो प्रेक्षकांच्या जास्त जवळ जाऊ नये म्हणून त्याला एकटे पाडलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरेला बिग बॉसच्या घरात एकाकीपणा जाणवत आहे. आपल्याला मुद्दामहून एकटं पाडलं जात असल्याचे तो यावेळी बोलताना दिसला.
हिंदी बिग बॉसच्या घरात अब्दु रोझीक हा एक तझाकिस्तानचा सदस्य आहे, जो प्रेक्षकांचेच नाही तर घरातील सर्वच सदस्यांचे लक्ष्य वेधत आहे. या छोटूला हिंदी भाषा फारशी अवगत नसल्याचे त्याच्या बोलण्यावरून कळते त्यामुळे घरातील सगळेजण त्याच्याशी संवाद साधण्यासाठी हिंदी इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसत आहेत. साजिद खान देखील या छोटुसोबत चांगलीच मजामस्ती करताना दिसला आहे. अर्थात साजिद खान मी टू प्रकरणामुळे आपली इमेज बद्दलवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. घरातील सर्व सदस्यांसोबत तो तेवढ्याच आत्मीयतेने बोलताना पाहायला मिळाला. घरातील एकंदरीत वातावरण हसतं खेळतं वाटत असलं तरी शिव ठाकरे या सर्वांमधून काहीसा वेगळा झाला असल्याचे दिसते.
शिव ठाकरेला नॉमीनेट करण्यात आले असल्याने तो काहीसा नाराज झाला होता. साजिदच्या स्टॅण्ड अप कॉमेडीने शिवला थोडेफार हसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साजिद आणि शिवमध्ये थोडेसे बॉंडिंग जुळून आलेले दिसले. शिवने साजिदला याच विचाराने ‘या घरात आपल्याला एकटं पाडलं जातंय’ अशी मनातली खंत बोलून दाखवली. त्यावेळी साजिदने चेहऱ्यावर एक स्माईल आणून शिवला चिअर केलं. या सर्वात अब्दु शिवला ब्रो म्हणून हाक मारतो त्यामुळे या दोघांचे मैत्रीचे सूर थोडेफार जुळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंग्लिश हिंदी अशा भाषेत बोलून शिव अब्दु सोबत मैत्री बनवत आहे.
या दोघांचे बॉंडिंग बाहेर प्रेक्षक देखील एन्जॉय करत आहेत त्यामुळे शिव ठाकरे हळूहळू प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहे. प्रियांका आणि अंकित सोबतही शिवचे मैत्रीपूर्ण सूर जुळू लागले आहेत. परंतु बिग बॉस लवकरच काहीतरी टास्क आणून या मैत्रीच्या नात्यात विघ्न आणू शकतो असेही बोलले जात आहे. काही दिवसाच्या अवधीत आपल्याला एकटं वाटणं हे शिवने बोलून दाखवले. असे असले तरी तो या घरात किती दिवस तग धरून राहणार याची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्रातील तमाम चाहते त्याला आपला मराठी माणूस या नात्याने तेवढाच सपोर्ट करत असल्याने तो या घरात टिकून राहील असे बोलले जात आहे.