काहीही झाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ असे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. कलाकारांची आपल्या कामाप्रति निष्ठा असली की कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाऊ न देता आपले शूटिंग पूर्ण करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आपल्या एकट्यामुळे इतर कलाकार अडकून राहू नयेत आणि निर्मात्याचे नुकसान होऊ नये हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो. आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर भरभरून प्रेम दिले आहे त्यामुळे ही मालिका ह्या आठवड्यात देखील टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आली आहे. याचे संपूर्ण श्रेय मालिकेतील कलाकार मंडळी, बॅक आर्टिस्ट आणि दिग्दर्शकाकडे जाते असे म्हटले जाते.
मात्र या यशाच्या प्रवासात अनेक अडथळे येत असतात हे अडथळे पार करत असताना एकमेकांची साथही तेवढीच महत्वाची मानली जाते. मालिकेच्या सेटवर असाच एक प्रसंग अनुभवायला मिळाला. मालिकेतील आप्पा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले यांची तब्येत खूप खालावली होती. आपल्या मुळे कोणाची गैरसोय होऊन नये म्हणून त्यांनी ताप असतानाही शूटिंगला येण्याचे ठरवले होते. गोळ्या औषधं घेऊन सुद्धा त्यांना तीन दिवस ताप येत होता खूप थकवा जाणवत होता. अशा परिस्थितीत त्यांची तब्येत खूपच खालावली होती त्यांना नीट बसताही येत नव्हतं. सेटवर त्यांचा सिन नसेल तेव्हा ते झोपून असायचे. पण अशा परिस्थितीत देखील ते शूटिंगला येत होते हे विशेष. यामागे त्यांचा हेतू हाच होता की, ‘आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल’.
मिलिंद गवळी यांनी किशोर महाबोले म्हणजेच आप्पांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कौतुकात एक पोस्ट शेअर करताना मिलिंद गवळी म्हणतात की, आप्पांच्या अंगात ताप होता, अंगात कणकण होती, थकवा आला होता, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं. त्यांना खूपच त्रास होत होता, गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन तीन दिवस तो ताप उतरत नव्हता, कणकण थांबत नव्हती. पण ते शूटिंग करत होते कारण एपिसोड जायचा होता. आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल. ‘आई कुठे काय करते’ यशस्वी होण्याचं एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात. आपल्या कामावर अतोनात प्रेम करतात, काही महिन्यांंपूर्वी किशोरजी एक सीन करत होते आणि त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे.
डायरेक्टर रवी करमरकर यांनी जायला सांगितले पण आप्पांनी सीन पूर्ण करायचा निर्णय घेतला. वडिलांची बातमी कळल्यानंतर एक विनोदी सीन करणं किती यातना देणारं असू शकतं याची कल्पना करणं खूप कठीण आहे. या पावणेतीन वर्षांमध्ये बहुतेक सगळ्या कलाकारांनी आणि आई कुठे काय करतेच्या टीम ने शारीरिक, मानसिक, कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून खूप कठीण परिस्थितीमध्ये शूटिंग पूर्ण केलं आहे. बरं या गोष्टींचा बाऊ न करता, त्याची सहानुभूती न घेता, हे जे काय काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहणे, कामालाच महत्त्व देत राहणे. आपल्या मुळे ८० लोकांच्या युनिटला त्रास होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, हे एक खूप महत्त्वाचं कारण असतं. हे सगळं हसत खेळत मस्ती करत चाललेलं असतं. शेवटी मिलिंद गवळी असेही म्हणतात की ‘दुनिया में रेहना है तो काम कर प्यारे’.