मालिकेत नायक नायिका इतकी खलनायिकेची भूमिका तितकीच महत्त्वाची मानली जाते. या पात्राचा प्रेक्षकांना राग येत असला तरी देखील त्यांच्या असण्याने मालिकेला खरा रंग चढलेला पाहायला मिळतो. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत देखील असे पात्र दाखवण्यात आले ज्याचा प्रेक्षकांना अक्षरशः तिरस्कार वाटू लागला. सीमा चौधरी उर्फ सिम्मी आंटीच्या विरोधामुळे नेहा आणि यशच्या प्रेमाला रंग चढत गेला. हे पात्र अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी त्यांच्या अभिनयाने सजग केले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या शीतल क्षीरसागर यांनी शाळेतील नाटकांमधून सहभाग दर्शवला, यासोबतच नृत्याचेही धडे त्यांनी गिरवले.
पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाट्यस्पर्धा गाजवल्या. १९९९ साली रात्र आरंभ या चित्रपटाने त्यांना अभिनयाची संधी मिळवून दिली. एक होती वादी या चित्रपटातील त्यांच्या प्रमुख भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून शीतल क्षीरसागर अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. का रे दुरावा, रणांगण, क्वीन मेकर, आई कुठे काय करते, एक होती राजकन्या या मालिकेतून त्यांना विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने त्यांना आणखी लोकप्रियता मिळवून दिली. सिम्मीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली. ही भूमिका माझ्यासाठी तितकीच महत्वाची ठरली असे म्हणत शीतल क्षीरसागर यांनी मालिकेला आणि या भूमिकेला निरोप देताना भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
त्या म्हणतात की, सिम्मीच्या प्रवासातला हा शेवटचा शॉट. आमची मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आता लवकरच तुमचा निरोप घेईल. अनोखी वळणं घेत एका सुंदर टप्प्यावर ह्या गुंतागुंतीच्या भुमिकेचा निरोप घेताना संमिश्र भावनांची आंदोलनं गेली काही दिवस अनुभवत होते. पण काल सिम्मीला निरोप देताना “चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनो” हे साहीर लुधियानवीचे शब्द मनात रुंजी घालत होते. सिम्मीच्या प्रवासात मी कधी एकटी नव्हतेच. माझी संपूर्ण टीम आणि तुम्ही सगळे बरोबर होतात. आशीर्वाद, मार्गदर्शन, आनंद, कौतुक, शाबासकी,अपमान, अश्रू, कठोर मेहनत आणि टीका ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे सिम्मी. मला ती शोधण्यासाठी आणि सापडण्यासाठी सगळ्यांची मदत झाली, सगळयांची आभारी आहे.