टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. अशाच धाटणीचा आणखी एक धमाल रिऍलिटी शो स्टार प्रवाह वाहिनीवर देखील पाहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या बाबतीत पुढे असलेली पाहायला मिळाली आहे.
आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यात आता नव्या रिऍलिटी शोची भर पडणार आहे. येत्या १० सप्टेंबर पासून शनिवारी आणि रविवारी रात्री ९.०० वाजता ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा नवा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करणार असल्याने त्याची एक वेगळीच ऊर्जा या शोमध्ये प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवताना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवरील मालिकेतील कलाकार या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं, तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली आहे.
यात मल्हार आणि जयदीप म्हणजेच अभिजित खांडकेकर आणि मंदार जाधव हाय हिल्सचे सँडल घालून रॅम्पवॉक करताना दिसणार आहेत. एखाद्या प्रोफेशनल मॉडेलप्रमाणे रॅम्पवॉक करताना या दोघांचा उडालेला गोंधळ पाहून त्यांचे सहकलाकार मात्र हसून हसून पुरते लोटपोट झालेले पाहायला मिळतील. त्यामुळे या शोची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. सिद्धार्थ जाधवने झी मराठीच्या हे तर काहीच नाय या शोचे सूत्रसंचालन केले होते, त्यात त्याला अक्षया देवधरची साथ मिळाली होती. कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या बिग बॉसच्या ४ च्या सिजनच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सिध्दार्थकडे सोपवली जाईल अशी मध्यंतरी चर्चा होती.
कारण महेश मांजरेकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने काही दिवस या शोची धुरा सांभाळली होती. परंतु बिग बॉससाठी सिध्दार्थचे सूत्रसंचालन गंभीर वाटणार नाही. त्याने जर सूत्रसंचालन केले तर तो एक कॉमेडी शो वाटेल असे मत जाणकार प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. त्यामुळे यासाठी महेश मांजरेकरच योग्य असतील अशी चर्चा जोर धरताना दिसली होती. सिध्दार्थकडून हा रिऍलिटी शो सुटला असला तरी आता होऊ दे धिंगाणा या शोमधून तो सूत्रसंचालक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हा धिंगाणा अनुभवण्यासाठी प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक आहेत.