आज मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी पहाटे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. गिरगाव येथील ठाकरद्वार येथे राहत्या घरी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. आणि यातच त्यांचे दुःखद निधन झाल्याचे समोर आले आहे. या बातमीने मराठी सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील एका नामांकित बँकेत नोकर करत होते. नोकरी करत असताना त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. टूर टूर, मोरूची मावशी ही त्यांची पदार्पणातील गाजलेली नाटकं. हे नाटक पाहण्यासाठी आणि विजय पटवर्धन यांना पाहण्यासाठी खास करून तरुणी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत होत्या.
नाटकातून काम करत असताना त्यांनी दूरदर्शनवरील मालिकांमध्ये प्रवेश केला. एक शोध, परिस, चष्मे बहाद्दर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, पोलीस लाईन, नवरा माझा नवसाचा, नवरा माझा भवरा अशा चित्रपट मालिकेत त्यांनी साकारलेल्या भूमिका आठवणीत राहण्यासारख्या आहेत. एक विनोदी अभिनेता ते खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत निभावल्या आहेत. बँकेची नोकरी सांभाळून त्यांनी मालिका, चित्रपटात अजरामर भूमिका साकारल्या. बँकेच्या नोकरीमुळे त्यांना कधी आर्थिक चणचण जाणवली नाही. कॉमेडी एक्सप्रेस या शोमुळे मी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलो, या शोमुळे मला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली असे प्रदीप पटवर्धन म्हणाले होते.
नृत्याची विशेष आवड असलेल्या प्रदीप पटवर्धन यांनी महाराष्ट्राची लोकधारा मधील आठशे खिडक्या नऊशे दारं या गाण्यावर धम्माल नृत्य सादर केले होते. त्यांच्या या आठवणी रसिक प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहतील. गेल्या काही दिवसांपासून ते अभिनय क्षेत्रापासून बाजूला होते. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या अभिनयानं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याला मराठी रसिक जन मुकले आहोत. आपल्या अभिनयाने भुरळ पाडणाऱ्या या हरहुन्नरी कलाकारास आमच्या संपुर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.